Fri, Apr 26, 2019 17:20होमपेज › Konkan › कोकणात येणार परदेशी उद्योजक 

कोकणात येणार परदेशी उद्योजक 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चिपळूण : खास प्रतिनिधी

रिव्हर्स आणि माउंटेनिअर्स संस्थेच्या वतीने 20 व 21 मे रोजी कोकण कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई येथील सहारा स्टार येथे हा कार्यक्रम होणार आहे. या निमित्ताने देश, परदेशातील 50 उद्योजक कोकणच्या दौर्‍यावर येणार आहेत. 

या संस्थेचे दिनेश कांजी आणि समीर गुरव यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, आज कोकणात निसर्गसंपदा असताना जगाला या निसर्गाची ओळख झालेली नाही. जगभरातील पर्यटक गोव्याला येतात आणि तेथून निघून जातात. मात्र, कोकणाला मोठा निसर्ग आणि समुद्रकिनारा लाभला आहे. याचा उपयोग पर्यटन उद्योग आणि फळप्रक्रिया उद्योगात करून घेतला पाहिजे. यासाठी या संस्थेतर्फे या कोकण कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई येथील कार्यक्रमानंतर कोकणातील जिल्ह्यात परदेशी उद्योजक भेटी देणार आहेत. कोकणातील समुद्र किनारे, पर्यटनात्मक स्थळे, फळप्रक्रिया उद्योग, पर्यटनात्मक व्यवसाय याबाबत या परदेशी उद्योजकांबरोबर स्थानिक उद्योजकांची चर्चा घडवून आणली जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून कोकणच्या पर्यटन विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 

यानिमित्ताने 21 मे रोजी रायगड, 22 मे रोजी रत्नागिरी आणि 23 मे रोजी सिंधुदुर्ग या ठिकाणी परदेशी उद्योजक फेरफटका मारणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कोकण पर्यटन आणि फळप्रक्रिया उद्योग या विषयी मान्यवरांचे व्याख्यान आणि चर्चासत्र ठेवण्यात आले आहे. परदेशी उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी आणि कोकणी उत्पादनांना परदेशात स्थान मिळण्यासाठी या कार्यक्रमात कोकणच्या उद्योजक आणि फलोत्पादकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags : Konkan, Konkan News, Foreign, entrepreneurs, coming,  Konkan


  •