होमपेज › Konkan › धनगर समाजाची आरक्षणासाठी ३० सप्टेंबरची मुदत

धनगर समाजाची आरक्षणासाठी ३० सप्टेंबरची मुदत

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 10:50PMकणकवली ः वार्ताहर

महाराष्ट्रातील धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन भाजपाकडून 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये देण्यात आले होते. मात्र गेल्या चार वषार्ंत याविषयी कोणत्याही हालचाली न करता वेळकाढू धोरण शासनाकडून अवलंबिण्यात आले आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे ही मुख्य मागणी असून त्यासाठी शासनाला 30 सप्टेेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शासनाने या मुदतीत आरक्षण जाहीर न केल्यास ऑक्टोबरमध्ये धनगर समाजाकडून महाराष्ट्र व्यापी उग्र आंदोलन छेडण्यात येणार असून सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती धनगर समाज आरक्षण संघर्ष कृतीसमितीकडून देण्यात आली. 

धनगर समाज आरक्षण संघर्ष कृतीसमितीची बैठक शनिवारी कणकवली येथे घेण्यात आली. बैठकीस सीताराम जानकर, पांडुरंग काळे, विजय खरात, संजय पाटील, मालोजी कोकरे, दिनेश खरात यांच्यासह अन्य उपस्थित होते. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे, दुर्गम भागात राहणार्‍या धनगर समाजाच्या वाडया-वस्त्यांपर्यंत रस्ते, पाणी या सारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, विधान परिषदेप्रमाणे जिल्हा परिषदांमध्ये स्विकृत सदस्यांची निवड करून त्यात धनगर समाजाला स्थान मिळावे, समाजातून विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्यात यावेत, ग्रामपंचायत स्तरावर विशेष निधी समाजाला उपलब्ध व्हावा, अशा प्रमुख मागण्या धनगर समाजाच्या आहेत, ऑक्टोबरमध्ये तीव्र आंदोलन होणार आहे. 

सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी कार्यालयावर होणार्‍या मोर्चात खा.डॉ.विकास महात्मे, माजी आ. प्रकाश शेडंगे, आ.रामराव वरकुते, आ.रामहरी रुपनवर, बापूसाहेब शिंदे आदी नेते उपस्थित राहणार आहेत.