Fri, Nov 16, 2018 04:31होमपेज › Konkan › निवडणुकांसाठी भाजपा-सेना युती होणारच! : चंद्रकांत पाटील 

निवडणुकांसाठी भाजपा-सेना युती होणारच! : चंद्रकांत पाटील 

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 8:03PMसावंतवाडी : प्रतिनिधी

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका भाजपा शिवसेना युती करूनच लढवणार असल्याची घोषणा महसूलमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावंतवाडी येथे केली. गेल्या सत्तर वर्षात जे प्रश्‍न सुटलेले नाहीत ते प्रश्‍न युतीचे सरकार सोडवेल, असेही त्यांनी सांगताना आंबोली, चौकुळ, गेळे गावकबुलायतदार प्रश्‍नावर सकारात्मक तोडगा काढणार असल्याचे सांगितले.

सावंतवाडीतील पर्णकुटी विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सद्यस्थितीमध्ये महामार्गाला पडलेले खड्डे तसेच आतील रस्त्यांना पडलेले खड्डे भरले जात असल्याबद्दल आपण पूर्ण समाधानी नाही. परंतु गणपतीसाठी ही तात्पुरती व्यवस्था आहे. खड्डे बुजविले तरी त्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडू नयेत यासाठी दर 50 किलोमीटरच्या अंतरावर एक पेट्रोलिंग टीम तैनात केली जाणार असून पडलेले खड्डे पुन्हा बुजविले जातील.

आंबोली घाटातील रस्त्याची दुरुस्ती पाच ते सहा दिवसांत करून हा घाटमार्गही सुरळीत केला जाईल. फोंडाघाट आणि करूळ घाटाचे काम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आंबोली चौकुळ, गेळे गावकबुलायतदार प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. असेही ते म्हणाले. सावंतवाडी तहसीलदार कार्यालय इमारत अपूर्ण असल्याबद्दल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले. आंबोली पर्यायी घाट मार्गासाठी पुणे येथील खासगी कंपनीला केसरी फणसवडे पर्यायी घाटमार्गाचे काम दिल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.