Mon, May 20, 2019 22:06होमपेज › Konkan › हत्ती हटावसाठी दोडामार्गात उपोषण

हत्ती हटावसाठी दोडामार्गात उपोषण

Published On: Jun 12 2018 12:52AM | Last Updated: Jun 11 2018 10:38PMदोडामार्ग  : प्रतिनिधी

हेवाळे-बाबरवाडी, सोनावल, मेंढे, मुळस, केंद्रे विजघर, पाळये, बांबर्डे, घाटिवडे या गावांतील बहुसंख्येने शेतकर्‍यांनी येथील वनविभाग कार्यालयासमोर हत्ती कायमस्वरूपी हटाव, वाढीव नुकसानभरपाई मिळावी, यासाठी बेमुदत उपोषण सोमवारपासून सुरू केले आहे. जोवर ठोस लेखी उत्तर मिळत नाही, तोवर उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा वनविभागाला शेतकर्‍यांनी दिला आहे.

गेल्या दहा वर्षांपासून वरील सर्व गावांत हत्तीकडून बागायतीचे मोठ्या  प्रमाणात नुकसान सुरू आहे. वनविभागाकडून ठोस पर्याय काढला नसल्याने नुकसानीचे सत्र सुरूच आहे. अनेक वेळा हत्ती हटाव मोहीम राबवा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली. पण वनविभागाच्या अधिकार्‍यामुळे आणि शासनामुळे ही मोहीम नावापुरतीच राहिली आहे. परिणामी स्वमेहनतीमुळे अनेक पिढ्यांनी उभ्या केलेल्या बागायती जमीनदोस्त होत आहेत. त्यानंतर होणारी नुकसानभरपाई  तुटपुंजी मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, हजारोंच्या घरात भरपाई मिळाली आहे. शासन आणि वनविभागाला हत्ती हटवता येत नसतील तर वर्षाला दहा लाख रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी देखील शेतकर्‍यांनी केली.

सोमवारी सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यांच्यावर शेतकर्‍यांनी अनेक प्रश्‍नांची सरबत्ती केली. एक वर्षापूर्वी हत्ती हटाव मोहिमेचा प्रस्ताव पाठविला त्याचे काय झाले? आणखीन किती वर्षे हत्तीमुळे आम्ही त्रास सहन करायचा? असे एक ना अनेक प्रश्‍न त्यांच्यावर करत त्यांना धारेवर धरण्यात आले. श्री.पुराणिक म्हणालेत आपला हत्ती पक्‍कड मोहीम प्रस्ताव कोल्हापूर मुख्य संरक्षक यांच्याकडे पाठविला असून तो नागपूर येथून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल, आणि नुकसान भरपाई अधिकाधिक मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे, असे ते म्हणालेत. यांवर शेतकर्‍यांचे समाधान झाले नाही. जोवर असे लेखी आश्‍वासन मिळत नाही, तोवर उपोषण मागे घोणार नाही, असा ठाम निर्धार शेतकर्‍यांनी केला आहे. उपोषणस्थळी पं.स.सदस्य बाबुराव धुरी, युथ संघटना अध्यक्ष वैभव इनामदार, सरपंच संघटना अध्यक्ष प्रवीण गवस यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला.