Thu, Jun 27, 2019 09:39होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात ८८ टक्के मतदान

कोकण पदवीधरसाठी  ६७.३२ % मतदान 

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 10:19PMकणकवली : प्रतिनिधी

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 88.06 टक्के मतदान झाले.  जिल्ह्यातील 3091 पुरुष मतदारांनी आणि 1583 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांमध्ये एकूण 67.32 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील 21 मतदान केंद्रांवर चुरशीने उत्स्फूर्तपणे मतदान झाले. या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातच खरी लढत असल्याने 28 रोजी लागणार्‍या निकालाकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.

सकाळी 7 वा.पासून मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. ही निवडणूक विशेषत: शिवसेना आणि भाजप यांनी प्रतिष्ठेची केल्याने ही निवडणूक खर्‍या अर्थाने लक्षवेधी आणि चर्चेची ठरली. त्यासाठी गेले पंधरा दिवस व्यापक स्वरूपात दोन्ही पक्षांनी प्रचार मोहीम राबविली. पदवीधर, शिक्षक मतदारांच्या गाठीभेटी, मेळावे घेण्यात आले. त्यामुळे मतदारांमध्येही मोठ्या स्वरूपात जनजागृती झाली. यावेळी मतदान नोंदणीसाठी सर्वच पक्षांची परिश्रम घेतले होते. 

कणकवली तालुक्यात चुरशीने 90.19 टक्के मतदान झाले. वैभववाडी तालुक्यात 92 टक्के, दोडामार्ग तालुक्यात 84 टक्के, वेंगुर्ले तालुक्यात दोन केंद्रांवर 90.21 मतदान झाले. कुडाळ तालुक्यात 86.93 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. देवगड तालुक्यात तीन मतदान केंद्रावर 86.90 टक्केमतदान झाले.  सावंतवाडी तालुक्यात 85 टक्के तर मालवण तालुक्यात 89.87 टक्के मतदान झाले. सोमवारी सकाळपासूनच पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. परंतु तरीही मतदारांनी प्रत्येक मतदान केंद्रांवर रांगेत राहून उत्स्फूर्तपणे मतदान केले. 

सर्वाधिक मतदान सिंधुदुर्ग जिल्ह्यात 

पालघर जिल्ह्यामध्ये 63.89 टक्के, ठाणे जिल्ह्यामध्ये 61.79 टक्के, रायगड जिल्ह्यामध्ये 82.11 टक्के, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 61.57 टक्के आणि सर्वात जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 88.06 टक्के इतके मतदान झाले. कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती मते पडतील, याची चर्चा सुरू होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुलनेने मतदारसंख्या सर्वात कमी होती. तरीदेखील सिंधुदुर्गातील मते निर्णायक ठरतील, असे राजकीयतज्ज्ञांचे मत आहे.