होमपेज › Konkan › पूर ओसरला; धास्ती कायम

पूर ओसरला; धास्ती कायम

Published On: Jul 09 2018 1:03AM | Last Updated: Jul 09 2018 1:03AMखेड : प्रतिनिधी

तालुक्यात गेल्या अठ्ठेचाळीस तासांत मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली असून, शनिवारी अतिवृष्टी झाल्याने नद्यांना आलेला पूर सायंकाळी उशिरा ओसरला असला तरी नागरिकांमध्ये भीती कायम आहे. रविवार दि. 8 रोजी बाजारपेठेत व्यापार्‍यांनी दुकानांची साफसफाई केली. रविवारी सकाळी 8.30 वा. च्या सुमारास तालुक्यातील किल्लेमाची या ठिकाणी दरड कोसळून दगड व माती नजीकच्या घरांपासून काही अंतरावर येऊन थांबल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ही बाब तहसील कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षात कळवली आहे.

खेडमध्ये पावसाची संततधार सुरू असल्याने व पालिका प्रशासनाने पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिल्याने व्यापार्‍यांनी दुकानांमध्ये माल विक्रीसाठी लावला नाही. तालुक्यात गेल्या 24 तासांत 152.57 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण 1311.44 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे.

खेड  तालुक्यात  मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. शनिवार दि.7 रोजी झालेल्या अतिवृष्टीत जगबुडी, नारिंगी व चोरद या मुख्य नद्यांसह त्यांच्या उपनद्यांना पूर आला होता. त्यामुळे शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. खेड बाजारपेठेला पुराचा वेढा पडला होता. तालुक्यातून जाणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गास खेड-दापोली मार्गदेखील ठप्प झाला. तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने राज्य परिवहनच्या बसफेर्‍या थांबवण्यात आल्या. शनिवारी सायंकाळी पावसाने काहीकाळ विश्रांती घेतल्याने बाजारपेठेतील पूर ओसरला तर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. गेल्या 24 तासात तालुक्यात सरासरी 152.57 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.  

शनिवार दि.7 रोजी रात्री उशिराने पुराचे पाणी ओसरल्यानंतर व्यापार्‍यांनी बाजारपेठेत स्वच्छता केली. पालिका प्रशासनाने सातत्याने सतर्कतेच्या सूचना दिल्याने काही व्यापारी सावध होते. परंतु पुराचे पाणी झपाट्याने चढल्याने साहित्य सुरक्षित स्थळी नेण्यास काहीजणांना वेळ मिळाला नाही. त्यामुळे  काही व्यापार्‍यांचे नुकसान झाले. रविवार दि.8 रोजी बाजारपेठेत व्यापार्‍यांनी दुकानांची स्वच्छता केली व झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. पुराचे पाणी शिरलेल्या दुकानांमधील विक्रीसाठी वस्तू ठेवण्याचे फर्निचर, विद्युत जोडण्या आदी पाण्यामुळे खराब झाले असून नुकसानाचा आकडा काही लाखांमध्ये जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

खेड तालुक्यातील घेरापालगड किल्लेमाची या ठिकाणी डोंगरावरून रविवार दि.8 रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास दगड व माती ढासळून पायथ्याच्या घरांपासून काही अंतरावर येऊन थांबल्याने येथील रहिवासी भयभीत झाले आहेत. त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ खेड पोलिसांना कळवली. पोलिस उपनिरीक्षक बाबुराव धालवलकर, श्री.  मोरे यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ खेड तहसील कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षात या बाबत माहिती दिली आहे. प्रशासनाने देखील या ठिकाणी लक्ष केंद्रीत केले असून नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

तालुक्यातील धरण क्षेत्रात गेल्या 24 तासांत सरासरी तब्बल 213 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यात एकूण सरासरी 1311.44 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली तरी धरणक्षेत्रात सरासरी 1674 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडला आहे.