Thu, Jun 27, 2019 09:44होमपेज › Konkan › राजापूर शहरात पूरसदृश स्थिती 

राजापूर शहरात पूरसदृश स्थिती 

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 10 2018 10:21PMराजापूर : प्रतिनिधी

तालुक्यात शनिवारी रात्रीपासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणार्‍या कोदवली व अर्जुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून शहरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. 
जवाहर चौकातील नदी काठालगतच्या टपर्‍यांपर्यंत पाणी आले आहे. तर चिंचबाध येथील रस्त्यावर अर्जुना नदीचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. रविवारी तालुक्यात सरासरी 122 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 

राजापूर तालुक्याला गेले दोन दिवस पावसाने झोडपून काढले आहे. शनिवारी रात्रीपासून तालुक्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. रविवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. शहरातून वाहणार्‍या अर्जुना व कोदवली नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोदवली नदीचे पाणी जवाहर चौकातील नदी किनार्‍यालगत असलेल्या टपर्‍यांपर्यंत आले होते. तर अर्जुना नदीला पूर आल्याने नवजीवन पासून चिंचबांध ते वरचीपेठ दरम्यानचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे शिळ, गोठणे-दोनिवडे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.अर्जुना व कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने सावध झालेल्या बाजारपेठेतील दुकानदारांनी पुराचे पाणी वाढण्यापूर्वीच दुकानातील सामान सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरूवात केली होती. पावसाचा जोर कायम राहिल्यास रात्री कोदवली नदीचे पाणी बाजारपेठेत शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग सावध झाला आहे.