Tue, Jul 14, 2020 07:55होमपेज › Konkan › भरधाव डंपर घुसला थेट बंद घरात 

भरधाव डंपर घुसला थेट बंद घरात 

Published On: Jun 13 2019 1:33AM | Last Updated: Jun 12 2019 10:26PM
कुडाळ : प्रतिनिधी

पिंगुळी-पाट मार्गावरून भरधाव जाणार्‍या डंपरने पाट- गोसावी स्टॉप येथील सुहास पाटकर यांच्या अंगणातील तुळस उडवून देत थेट बंद घरात घुसला. डंपरची  धडक एवढी जबरदस्त होती की घराची  भिंत कोसळली. या अपघातात घरासह डंपरच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने डंपर चालक बचावला. निवती पोलिसांनी डंपर चालकाला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला.  हा अपघात बुधवारी सायंकाळी 4.30 वा.च्या सुमारास झाला.

मालवण तालुक्यातील देवली खाडीत वाळु उपसा सुरू आहे. ही वाळू  कुडाळमार्गे गोवा राज्यात नेली जाते. गोवा येथील दिलीप चौधरी डंपर घेवून  देवली येथे वाळू भरण्यासाठी जात होता.  पाट-गोसावी स्टॉप येथील वळणावर चालकाचा या डंपरवरील ताबा सुटल्याने डंपर त्याच वेगात  रस्त्याच्या उजवीकडील सुहास पाटकर यांच्या अंगणातील तुळस उडवत थेट घरात घुसला. सुहास पाटकर यांचे  घर बंद असल्याने अनर्थ टळला. डंपरच्या या धडकेत घराची भिंत कोसळून छप्पराचेही नुकसान झाले. या घटनेची निवती पोलिसांना माहिती मिळताच  पोलिस निरीक्षक अमोल साळुंखे घटनास्थळी हजर झाले व त्यांनी डंपर चालकाला ताब्यात घेत पोलिस स्थानकात आणले.

अपघातानंतर ग्रामस्थांनी  भरधाव डंपर वाहतुकीबाबत संताप व्यक्‍त केला. याची दखल पोलिस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी  परूळे वेतोबा मंदिर येथे भरधाव  डंपर रोखून चालकांवर केसेस  दाखल करण्याची कारवाई  सुरू केली. 

...आतातरी डंपर वाहतुकीला ब्रेक लागेल का?

देवली खाडी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. ही वाळू भरण्याकरिता डंपर चालकामध्ये नंबराकरिता चढाओढ असते. अधिक ट्रिपा बसल्यास अधिक फायदा होत असल्याने डंपर चालक सुसाट वेगाने डंपर हाकत असतात. या भरधाव डंपर वाहतुकीमुळे शाळकरी मुले, मोटारसायकलस्वार व पादचार्‍यांना जीव  मुठीत घेवून या मार्गावरून जावे  लागते. याबाबत संबंधित यंत्रणा सुशेगात असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्‍त करण्यात येत आहे.  या अपघातामुळे आतातरी प्रशासकीय यंत्रणा जागी होवून या भरधाव डंपर वाहतुकीला ब्रेक लावेल का? असा सवाल या  केला जात आहे.