Thu, May 23, 2019 14:33
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › डिंगणकर दाम्पत्याची पंचावन्‍न लाखांची मालमत्ता हस्तगत

डिंगणकर दाम्पत्याची पंचावन्‍न लाखांची मालमत्ता हस्तगत

Published On: Mar 25 2018 12:36AM | Last Updated: Mar 25 2018 12:36AMचिपळूण : शहर वार्ताहर

ब्राह्मण नागरी सेवाभावी पतसंस्थेत सव्वापाच कोटी रुपयांचा अपहाराचा ठपका असलेल्या डिंगणकर दाम्पत्याची 55 लाखांची मालमत्ता येथील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यातील प्रमुख संशयित लोवलेकर याच्या शोधासाठी पोलिसांची पथके मागावर गेली असून, लवकरच तो हाती लागेल, असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्‍त केला. शहरातील पतसंस्थेत अग्रगण्य नाव असलेल्या ब्राह्मण नागरी सेवाभावी पतसंस्थेत गेल्या काही वर्षांपासून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे गतवर्षी संचालक मंडळाने उघड केले. 

वर्षभरानंतर अपहाराची तक्रार 

या संदर्भात पतसंस्था अध्यक्षांनी सर्व आर्थिक व्यवहार, उलाढालींची तपासणी व खातरजमा करून सुमारे वर्षभरानंतर डिंगणकर दाम्पत्य, व्यवस्थापक लोवलेकर यांच्याविरोधात सुमारे वर्षभरानंतर अपहाराची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिस तपास वेगाने सुरू झाला. व्यवस्थापक लोवलेकर याच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली. मात्र, सद्य:स्थितीत त्याचा माग लागलेला नाही.

दरम्यानच्या काळात डिंगणकर दाम्त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. तेथे अपयश आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाकडून पोलिस कोठडी मिळाल्यावर पोलिसांच्या तपासात या अपहार प्रकरणात पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती व धागेदोरे हाती लागले. त्या नुसार पुढील तपासाची दिशा सुरू झाली आहे. या दाम्पत्याबाबत प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार केलेल्या कारवाईत वाहनांसह अन्य ऐवज अशी सुमारे 55 लाखांची मालमत्ता पोलिसांनी जप्‍त केली आहे. तसेच झडतीमध्ये अनेक प्रकारची महत्त्वाची व आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. दुकान गाळे, सदनिका, चारचाकी वाहने आदी मालमत्ता पोलिसांनी जप्‍त केली आहे. 

या झडतीमध्ये डिंगणकर याच्याकडे हातबेडी देखील आढळून आली. या बाबत संशयिताकडे चौकशी केली असता, तो वाहने प्रवाशांसाठी भाड्याने देत असल्याने अशाच एका वाहनात त्याच्या चालकाला ही बेडी गाडीत आढळून आल्याची प्राथमिक माहिती दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

Tags : Chiplun, Chiplun news, Brahmin Nagri Savbhavi Credit Society, fraud,