होमपेज › Konkan › मच्छीमारी हंगामाची आज सांगता!

मच्छीमारी हंगामाची आज सांगता!

Published On: Jun 01 2018 2:05AM | Last Updated: May 31 2018 10:27PMदेवगड : प्रतिनिधी

देवगडमधील खोल समुद्रातील मच्छीमारी व्यवसाय आटोपता घेतल्याने देवगड बंदरातील नौका किनार्‍यावर घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. मच्छीमारी हंगाम संपल्यामुळे लिलाव सेंटरही बंद झाले असून गजबजाट असलेल्या देवगड बंदरावर आता दोन महिने शुकशुकाट दिसणार आहे.ऑक्टोबरपासून देवगड बंदर पुन्हा गजबजू लागेल.

देवगडमधील खोल समुद्रातील मच्छीमारी व्यवसाय 1 जुनपासून बंद होत आहे.1 जून ते 31 जुलै या कालावधीत खोल समुद्रातील मच्छिमारी व्यवसाय बंद असल्यामुळे बंदरातील नौका किनार्‍यावर घेण्याचा प्रक्रियेला वेग आला आहे.40 टक्के नौका किनार्‍यावर घेतल्या असून जाळी धुणे, नौका शाकारणी कामे पूर्ण झालेल्या नौकांवरील खलासीवर्ग घरी गेला आहे. तर उर्वरीत नौका किनार्‍यावर घेण्याची प्रक्रिया सुरू असून आठ- दहा दिवसात नौका किनार्‍यावर घेणे, जाळी धुणे, नौका शाकारणी ही कामे आटोपून उर्वरीत खलासीवर्ग आपल्या गावाकडे परतणार आहेत.

एप्रिल व मे चा पहिला पंधरवडा हा मच्छीमारी हंगामासाठी महत्वाचा हंगाम समजला जातो. या हंगामात मोठ्या प्रमाणावर मासळी मिळते तसेच याच हंगामात मुंबईकर चाकरमानी आलेले असल्याने मासळीला स्थानिक बाजारपेठेत दर देखील चांगला मिळत असतो, मात्र हंगामाचा शेवटही मच्छीमारांच्या दृष्टीने फारसा लाभदायक ठरला नाही. तीन वर्षापूर्वी ज्या बळ्या माशाने मच्छीमारांना तारले होते, त्याच बळ्याने  पाठ फिरविल्याने व दर्जेदार मासळी न मिळाल्यामुळे यावर्षीचाही मत्स्यहंगाम समाधानकारक झाला नाही, अशी खंत  मच्छीमारांनी व्यक्‍त केली.

हंगाम सुरू झाल्यानंतर ऑगस्टमध्ये सर्वच नौका मच्छीमारीसाठी समुद्रात जात नसल्यामुळे काही मच्छीमारांना त्याचा फायदा झाला.त्यात करून हायस्पीड ट्रॉलर्स व परप्रांतीय नौकांकडून मोठ्या प्रमाणात मच्छीमारी केली जात असल्यामुळे मासळी मिळण्याचे प्रमाणही कमी झाले.शेवटी कोळंबी व लेप मासा थोड्या फार प्रमाणात मिळू लागल्याने डिझेलचा खर्च सुटला.मात्र, दर्जेदार मासळी मिळत नसल्यामुळे नौकामालक आर्थिक अडचणीत आले.

पातमालकांना हा हंगाम तोट्यातच गेला.फायबर पातीद्वारे करण्यात येणारी न्हैय मच्छीमारी व्यवसाय ही आटोपत आला असून  नौकेवरील जाळी धुणे व सुकविण्याचे काम सुरू आहे. जाळी धुणे,सुकविणे,फायबर पाती किनार्‍यावर घेणे,ट्रॉलर्स किनार्‍यावर घेणे व त्यानंतर ते शाकारणे इत्यादी कामात मच्छिमार गुंतले आहेत. नौका किनार्‍यावर काढणे जेसीबीद्वारे  फायदेशीर ठरत असल्याने जेसीबीचा वापर अधिक प्रमाणात होत आहे. तरीही अडचणीच्या जागेतील नौकांना मनुष्यबळाचाच आधार घ्यावा लागत आहे.