Fri, May 24, 2019 02:27होमपेज › Konkan › मालवण-दांडी येथे हायस्पीड नौकांकडून जाळ्यांचे नुकसान

मालवण-दांडी येथे हायस्पीड नौकांकडून जाळ्यांचे नुकसान

Published On: Apr 08 2018 2:12AM | Last Updated: Apr 08 2018 1:56AMमालवण : प्रतिनिधी

मालवण-दांडी येथील 11 वाव खोल समुद्रात मासेमारीसाठी पसरलेल्या जाळ्यांचे परराज्यातील हायस्पीड नौकांनी अतिक्रमण करून नुकसान केल्याची घटना घडली आहे. दांडी येथील लिओ कामिल काळसेकर यांची गिलनेट पद्धतीची 15 मासेमारी जाळी ‘त्या’ नौकांनी उद्ध्वस्त केल्याने सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबत लिओ काळसेकर यांच्यासह पारंपारिक मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने मत्स्य विभाग व पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधून परराज्यातील हायस्पीड नौकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर घुसखोरी करणार्‍या परराज्यातील नौकांविरोधात स्थानिक मच्छीमारांनी ‘हल्लाबोल’ आंदोलनातून आवाज उठविल्यानंतरही प्रशासनाकडून ठोस कारवाईबाबत काहीच धोरण निश्‍चित केले जात नाही. याचा फटका स्थानिक मच्छिमारांना बसत असून जिल्ह्याच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात हायस्पीड नौकांचा धुडगूस मोठ्या प्रमाणात घातला जाता आहे. याबाबत संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधूनही परराज्यातील नौकांवर कारवाई होत नसल्याने मच्छीमारांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.  
लिओ काळसेकर हे स्वतः ‘हॉलीक्रॉस’ ही यंत्र नौका घेवून 4 एप्रिल रोजी दुपारी 3 वा.मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. सुमारे 11 वाव खोल समुद्रात गिलनेट पद्धतीची मासेमारी करण्यासाठी 35 जाळी पसरवली.त्यानंतर रात्रीच्या वेळी परराज्यातील नौकांनी 11 वाव समुद्रात घुसखोरी करत समुद्रात पसरलेली मासेमारी जाळी तोडून नेली. यावेळी त्या नौकांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र, त्यांनी न जुमानता पोबारा केला. यात आमच्या 15 जाळ्यांचे सुमारे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले, असे निवेदनात म्हटले आहे. 

रात्रीची वेळ असल्याने त्या नौकांचा नोंदणी क्रमांक दिसून न आल्याने त्या कुठल्या राज्यातील आहेत, हे समजू शकले नाही. तरी मत्स्य विभाग व पोलिस प्रशासनाने सिंधुदुर्ग किनारपट्टीवर घुसखोरी करणार्‍या परराज्यातील नौकांवर कारवाई करण्याची मागणी मच्छीमारांनी केली. पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांना निवेदन सादर करताना लिओ काळसेकर यांच्यासह मच्छीमार नेते विकी तोरसकर, बाबी जोगी, संतोष देसाई, भाऊ मोरजे, बबलू मोंडकर, आबा सावंत, नारायण आडकर आदी मच्छीमार उपस्थित होते.