Wed, Mar 20, 2019 12:47होमपेज › Konkan › ‘हेल्पलाईन लाईव्ह फोन’ उपक्रमाला मच्छीमारांचा प्रतिसाद

‘हेल्पलाईन लाईव्ह फोन’ उपक्रमाला मच्छीमारांचा प्रतिसाद

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 11 2018 11:20PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

सहाय्यक आयुक्‍त मत्स्य व्यवसाय रत्नागिरी व रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने मच्छीमारांसाठी असलेल्या केंद्र सरकारच्या ‘नीलक्रांती’ योजनेसंदर्भात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई येथील मच्छीमारांसाठी हेल्पलाईन, लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील या नावीन्यपूर्ण प्रयोगाला उत्तम प्रतिसाद मिळाला. 

यावेळी कोकण किनारपट्टीतील मच्छीमारांनी थेट हेल्पलाईनवर फोन करून ‘नीलक्रांती’ योजनेसंदर्भात मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांकडून माहिती घेतली. यावेळी विविध निलक्रांतीच्या योजना, कालावधी, अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे इत्यादी बद्दल मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांनी उत्तरे दिली. यावेळी सहाय्यक आयुक्‍त मत्स्य व्यवसाय  विभागाचे साळुंखे, मत्स्य विकास अधिकारी दिलीप जाधव, आनंद पालव, रवींद्र मालवणकर, विजय कांबळे यांनी मच्छीमारांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. 

कार्यक्रम आयोजनासाठी रिलायन्स फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य कार्यक्रम समन्वयक दीपक केकाण यांनी मार्गदर्शन केले. रिलायन्स फाऊंडेशनतर्फे मत्स्य विषयक तज्ज्ञ अभिजित ठाकरे, रिलायन्स फाऊंडेशन रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे, कार्यक्रम सहाय्यक पंकज कांबळे, विक्रम जाधव, हेमंत जंगले, रणजित करंजकर यांनी परिश्रम घेतले.