Mon, Sep 24, 2018 07:06होमपेज › Konkan › मच्छीमारी ट्रॉलर्स खडकावर आदळून फुटला

मच्छीमारी ट्रॉलर्स खडकावर आदळून फुटला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी 

इंजिन नादुरुस्त होऊन सोसाट्याच्या वार्‍यामुळे समुद्रात भरकटलेला वाघजाई प्रसन्न ट्रॉलर किल्ले सिंधुदुर्गला लागून असणार्‍या खडकांवर आदळून फुटला. ही घटना रविवारी रात्री 7.30 वा. च्या सुमारास घडली. यामुळे ट्रॉलरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसून खलाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असतानाच मेढा-राजकोट येथील स्थानिक मच्छीमारांनी घटनास्थळी धाव घेत पाच तासांच्या अथक प्रयत्नांतून ट्रॉलरसह सहा खलाशांना सुखरूप किनार्‍यावर आणले. यामुळे या ट्रॉलरचे सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले. मात्र, समुद्रात अशा प्रकारे अपघात घडला असताना बंदर विभाग व मत्स्य व्यवसाय विभाग सुशेगात राहिल्याने मच्छीमारांनी तीव्र संताप व्यक्त केला.

रत्नकांत वामन वडपकर 
(रा. खारवीवाडी, पावस-रत्नागिरी) यांच्या मालकीचा वाघजाई प्रसन्न हा ट्रॉलर समुद्रात मासेमारीला गेला होता. वडपकर यांनी हा ट्रॉलर दोन वर्षांपूर्वी खरेदी केला होता. रविवारी सायंकाळी  हा ट्रॉलर मालवण बंदरात परतत होता. या ट्रॉलरवर नीलेश शिंदे, विजय वाईम, राजेश कांबळे, संजय कांबळे, कृष्ण सूद, भिकाजी धोपावकर असे सहा खलाशी होते.  
 ट्रॉलर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस आला असता अचानक ट्रॉलरच्या इंजिनचा पट्टा तुटून इंजिन बंद पडले. यामुळे सोसाट्याच्या वार्‍यात हा ट्रॉलर भरकटून सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दिशेने जाऊन किल्ल्याला लागून असणार्‍या खडकांवर आदळला. 
 

Tags : malwan, Fishermen


  •