Wed, Mar 27, 2019 06:03होमपेज › Konkan › वेत्ये येथे मच्छीमार बोटीला जलसमाधी

वेत्ये येथे मच्छीमार बोटीला जलसमाधी

Published On: Aug 21 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 9:11PMराजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील वेत्ये समुद्रात मच्छीमारीसाठी निघालेल्या बोटीला सोमवारी सकाळी 7 वा.च्या सुमारास जलसमाधी मिळाली. बोटीवरील  7 जणांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूला असलेल्या बोटींतील मच्छीमारांनी तत्काळ धाव घेत त्यांना बुडत्या बोटीतून  सुखरूप बाहेर काढले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रात बुडालेली बोट तुळसुंदे येथील असून ती ‘महालक्ष्मी’ या नावाची होती. तुळसुंदेमधील नितीन देवकर हे बोटीचे मालक असून त्यांच्या समवेत जगदीश शिरगावकर, पुरुषोत्तम नाटेकर, कुंदन आडीवरेकर, भिकाजी आडीवरेकर, संजय पावसकर व मारुती खडपे असे 7 जण सोमवारी तुळसुंदे बंदरातून समुद्रात मासेमारीसाठी निघाले होते. सकाळी सातच्या सुमारास त्यांची बोट किनार्‍यापासून साधारणपणे 500 मीटर अंतरावर आली असता अचानक  जोरात वारा वाहू लागला व त्यानंतर काही क्षणातच बोटीच्या तळाची लाकडी  फळी फुटून आता पाणी भरु लागले. त्यानंतर  बोट समुद्रात हेलखावे खावू लागली. 

अचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे बोटीवरील मालकासह अन्य 6 जण पार गांगरुन गेले. त्यांनी आरडाओरडा सुरु केला. त्यावेळी बुडत असलेल्या बोटीपासून आजूबाजूलाच काही अंतरावर बोटीदेखील समुद्रात मासळीसाठी चालल्या होत्या. त्यावर असलेल्या मच्छीमारांनी पाहिले. ते सर्व बुडत असलेल्या बोटीजवळ तात्काळ  पोचले. त्यानंतर दोरीच्या सहाय्याने अडकलेल्या सातही जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर काही काळातच त्या बोटीला जलसमाधी मिळाली.  या घटनेमध्ये नितीन देवकर यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नाटे पोलिस ठाण्याचे निरीक्षक कानसे व त्यांचे सहकारी घटनास्थळी हजर झाले. सुखरूप बचावलेल्या सर्वांनी इतर मच्छीमारांचे आभार मानले.