होमपेज › Konkan › मच्छीमार हे तटरक्षक दलाचे कान, डोळे : अजय दहिया

मच्छीमार हे तटरक्षक दलाचे कान, डोळे : अजय दहिया

Published On: Jun 07 2018 2:06AM | Last Updated: Jun 06 2018 10:51PMवेंगुर्ले : वार्ताहर

मच्छीमार बांधव हे तटरक्षक दलाचे कान व डोळे असून तटरक्षक दल व मच्छीमार यांनी एकत्र काम केल्यास सागरी सुरक्षा आणखी मजबूत होईल, असे प्रतिपादन तटरक्षक दलाचे असिसटंट कमांडट आणि मोटारसायकल रॅलीचे प्रमुख अजय दहिया यांनी केले.भारतीय तटरक्षक दलातर्फे आयोजित व महाराष्ट्र पोलीस, ओएनजीसी, रॉयल एन्फिल्ड, एचडीएफसी बँकतर्फे प्रायोजित मच्छीमार सुरक्षा संदेश व मार्गदर्शन मोटारसायकल रॅलीचे  वेंगुर्ले येथे आगमन झाले. यावेळी वेंगुर्ले  फळ संशोधन केंद्रामध्ये मच्छीमार बांधवांना सुरक्षा व तटरक्षक दल भरती प्रक्रिया या विषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रधान अधिकारी एस. एस. राठोड, उत्तम अधिकारी जे. गौतम, उत्तम यांत्रिकी सुशील कुमार, उत्तम नावीक व्ही. के.पटेल व पी.बी. शिंदे, वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे डॉ. एम. बी. दळवी, पोलिस अधिकारी मिलिंद कुंभारे, मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी श्री. खाडे, रत्नागिरी तटरक्षक दलाचे कर्मचारी व मच्छिमार बांधव उपस्थित होते.  

श्री. दहिया म्हणाले, मच्छिमारांनी समुद्रात जाताना प्रत्येकवेळी चॅनल 16 सुरू ठेवावे, जेणे करुन तटरक्षक दलास त्यांच्याशी संपर्क साधने सोपे जाईल. समुद्रामध्ये मच्छिमार  24 तास कार्यरत असतात. एखादी संशयास्पद हलचाल किंवा अनोळखी बोट आढळल्यास चॅनेल 16 द्वारे तटरक्षक दलास सूचना देता येईल. त्याशिवाय तटरक्षक दलाचे दूरध्वनी क्र. 022 - 22751026 या क्रमांकावरही  संपर्क करता येईल. मच्छीमारी करणार्‍या बोटींनी त्यांचा वीमा, परवाना व इतर कागदपत्रे कायम सोबत ठेवावीत. एखादी दुर्घटना घडल्यास मच्छिमारांना वीमा मिळणे व इतर मदत मिळण्यास त्यामुळे अडचण येणार नाही. मच्छिमारी व्यवसायातील मुलांनी तटरक्षक दलात भरती व्हावे, जेणे करुन समुद्राची माहिती असलेले जवान तयार होतील. त्याचा फायदा सागरी सुरक्षेला होईल. वर्षातून दोन वेळा तटरक्षक दलाची भरती प्रक्रिया होते. त्यामध्ये मच्छिमारांच्या मुलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री. दहिया यांनी केले.

तटरक्षक दलाचे अधिकारी मानिक बिश्‍वास यांनी मच्छिमारांना जीवन सुरक्षा उपकरणांची  माहिती व प्रात्यक्षिक दिले. त्यामध्ये इस्त्रोने मच्छिमारांसाठी तयार केलेल्या डीएई या उपकरणाची माहिती देण्यात आली.  पी. बी. शिंदे यांनी तटरक्षक दलातील भरती प्रक्रिये विषयी माहिती दिली. 2 जून रोजी मुंबईहून निघालेली ही रॅली, मुरुड, श्रीवर्धन, दापोली, दाभोळ, जयगड, मिकरवाडा, देवगड, मालवण असा प्रवास करुन बुधवारी वेंगुर्ले येथे पोहचली. वेंगुर्ल्यातून ही रॅली गुरुवारी मालवण येथे येणार आहे. मालवण येथे मच्छिमारांना मार्गदर्शन केल्यानंतर रत्नागिरी, मुरुंड जंजीरा मार्गे वरळी, मुंबई येथे पोहचणार आहे. 10 जून रोजी या रॅलीचा समारोप होणार आहे.