Tue, Mar 19, 2019 16:10होमपेज › Konkan › मत्स्य विभाग रत्नागिरीतच राहणार : तावडे

मत्स्य विभाग रत्नागिरीतच राहणार : तावडे

Published On: May 29 2018 1:37AM | Last Updated: May 28 2018 10:20PMरत्नागिरी :  प्रतिनिधी

कोकण कृषी विद्यापीठाकडे असलेला मत्स्यविद्यालय व विभाग नागपूर येथे स्थलांतरित करून कोकणवासियांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतली आहे. त्यामुळे मत्स्य विद्या शाखा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न राहील, असा निर्णय झाला. त्याला कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी तत्त्वतः संमत्ती दिली आहे.

रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालय नागपूर येथे स्थलांतरित करण्यात येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री तावडे यांनी पुढाकार घेत मंत्री फुंडकर यांच्या दालनात मंत्री जानकर तसेच दोन्ही विभागांचे उपसचिव, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे अधिकारी, म्हाप्सू विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू यांचे उपस्थितीत बैठक झाली. या वेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर, मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर उपस्थित होते.

कोकण कृषी विद्यापीठातील मत्स्य विद्याशाखा नागपूर येथे स्थलांतरित करण्याबाबतची वस्तुस्थिती दोन्ही विभागांतील उपसचिव यांनी विशद केली. या विषयाचे गांभीर्य ओळखून मंत्री तावडे यांनी बैठकीत उपस्थित राहून मत्स्य महाविद्यालय नागपूरला स्थलांतरित होऊ देणार नसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे कोकणातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांनी प्रदान केलेल्या पदवीपेक्षा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने प्रदान केलेल्या पदवीस जास्त महत्त्व असल्याचे नमूद केले. तावडे यांच्या आग्रही भूमिकेमुळे स्थलांतराची ही प्रक्रिया थांबविली आहे.