Fri, Apr 19, 2019 12:03होमपेज › Konkan › कापड दुकानाला आग

कापड दुकानाला आग

Published On: Jul 04 2018 2:14AM | Last Updated: Jul 03 2018 10:36PMआचरा : वार्ताहर

आचरा बाजारपेठेतील अरुण आत्माराम ढेकणे यांच्या मालकीच्या लक्ष्मी क्लॉथ स्टोअरला सोमवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीच्या भक्षस्थानी दुकानातील कपडे, तसेच छप्पर पडल्याने ढेकणे यांचे सुमारे साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने ही आग स्थानिकांनी वेळीच शमविल्याने मोठा अनर्थ टळला. ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आचरे-वरचीवाडी येथील अरुण आत्माराम ढेकणे यांच्या मालकीचे लक्ष्मी क्लॉथ स्टोअर असे कपडे विक्रीचे दुकान असून, सोमवार असल्याने सकाळी 8 वाजता ढेकणे यांनी दुकान उघडले व त्यानंतर ढेकणे हे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून कामाच्या निमित्ताने मालवणला गेले. ढेकणे यांनी त्यानंतर दुकान उघडले नाही. सोमवारी रात्रौ  11.30 वाजण्याच्या सुमारास ढेकणे यांच्या दुकानातून अचानक धुराचे लोळ बाहेर पडू लागले आणि बघता बघता आगीने उग्र रूप धारण केले  दुकानातून बाहेर पडणारे आगीचे लोट  स्थानिक ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर तेथील स्थानिक तरूण संदिप पांगम, योगेश घाडी, बाबू परुळेकर, शैलेश शेट्ये, निखिल ढेकणे, हार्दिक पाटकर, हेमंत गोवेकर, महेश शेट्ये, उज्वल कोदे, दाजी आचरेकर, विजय पाटकर आणि इतर ग्रामस्थांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी आग शमविण्यासाठी उज्वल कोदे आणि विजय पाटकर यांच्या विहिरीच्या  पाण्याच्या पंपाचा वापर करण्यात आला. बर्‍याच अवधीनंतर ही आग आटोक्यात आणण्यात स्थानिकांना यश आले.

या आगीत रेनकोट, गाद्या, रेडिमेड कपडे, ब्लँकेट, उश्या, चादरी, स्वेटर, लहान मुलांचे कपडे यासह दुकानाचे छप्पर या आगीत भस्मसात झाल्याने सुमारे साडेपाच लाख रुपयांची हानी झाली आहे. याबाबत ढेकणे यांनी आचरे पोलीस स्थानकात रीतसर फिर्याद दिल्यानंतर आचरे पोलीस निरीक्षक श्री. धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. सुनील चव्हाण, कैलास ढोले जाधव यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीचा पंचनामा केला. ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आग वेळीच शमविल्याने मोठा अनर्थ टळला. 

पंचनामा नाही, तहसीलदार कार्यालयात माहिती द्या

याबाबत श्री. ढेकणे यांनी मालवण तहसील कार्यालयात आगीची माहिती दिल्यानंतर बुधवारी तहसील कार्यालयात येऊन माहिती द्या असे त्यांना सांगण्यात आले. सध्या आचरे गावात तलाठी नसल्याने अशा घटनांच्या वेळी ग्रामस्थांना तलाठ्याची उणीव भासते. तलाठी नसल्याने या आगीच्या नुकसानीचा पंचनामा आज महसूल विभागाकडून करण्यात आला नाही.