Thu, Aug 22, 2019 12:28होमपेज › Konkan › रोणापाल-देवार्णे भरड परिसरातील काजू बागायतींना आग

रोणापाल-देवार्णे भरड परिसरातील काजू बागायतींना आग

Published On: Mar 20 2018 10:50PM | Last Updated: Mar 20 2018 10:30PMमडुरा : वार्ताहर

रोणापाल-देवार्णे भरड परिसरातील काजू बागायतींना सोमवारी दुपारी शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत सहाहून अधिक शेतकर्‍यांची सुमारे 50 एकरातील 500 हून अधिक काजू कलमे व अन्य झाडे जळून खाक झाली. शॉर्टसर्किटने आग लागली असतानाही जबाबदारी झटकणारे महावितरणचे बांदा येथील सहाय्यक अभियंता अनिल यादव यांना रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी धारेवर धरले. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर शॉर्टसर्किटनेच आग लागल्याचचे यादव यांनी मान्य केले. ऐन काजू हंगामात लागलेल्या या आगीने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महावितरणने तातडीने पंचनामा करुन संबंधित शेतकर र्‍यांना नुकसान भरपाई अदा करावी, अन्यथा महावितरण विरोधात प्रखर आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी सुरेश गावडे यांनी दिला.

रोणापाल-देवार्णे भरड परिसरात सोमवारी दुपारी काजू बागायतींना अचानक आग लागली. काजू गोळा करण्यासाठी गेलेल्या अनिता परब यांनी विद्युत खांबावरील इन्सुलेटर प्रत्यक्षात पेटताना पाहिल्यानंतर स्थानिकांना आग लागल्याची माहिती दिली. दुपारची वेळ असल्याने आग क्षणार्धात परिसरात वेगाने पसरली. स्थानिकांनी आग विझविण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. मात्र सोसाटयाचा वारा व बागायतीत गवत असल्याने आग नियंत्रणात आणण्यात अपयश आले. चार तासांच्या अथक प्रयत्नाअंती सायंकाळी आग विझविण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र तोपर्यंत सुमारे 50 एकर क्षेत्रातील 500 हून अधिक काजू कलमे जळून खाक झाली. त्याचबरोबरच फणस, सागवान यासारखी झाडेही आगीच्या भक्षस्थानी पडली.

या आगीत शेतकरी प्रकाश न्हानू शेगडे, अनिता अरुण परब, नारायण कृष्णा शेगडे, ज्ञानदेव कृष्णा शेगडे, विलास साबाजी नाईक, बबन सावंत आदी शेतकर्‍यांची सुमारे 500 हून अधिक काजूची झाडे जळाली. आग विझविण्यासाठी उपसरपंच भिकाजी शेगडे, प्रकाश शेगडे, न्हानु शेगडे, सागर शेगडे, नारायण शेगडे, अमित शेगडे, संजय शेगडे, प्रमोद शेगडे, अनिता परब, प्रेमा शेगडे, निलम शेगडे, ज्ञानदेव शेगडे, राजा गावडे, विनोद गावडे, विजय गावडे, अरुण परब, लक्ष्मण परब, जयवंत परब, प्रताप गावडे, बबन सावंत, विलास नाईक यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सदर दुर्घटनेचा महसुल प्रशासनाकडून पंचनामा करण्यात न आल्याने नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. उपसरंपच भिकाजी केणी, निगुडे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरुसाद गवंडे, बाळु गावडे, पोलिस पाटील निर्जरा परब, विलास पावसकर आदि उपस्थित होते.

ग्रामस्थांकडून महावितरणचे अभियंता धारेवर
काजू बागायतीला आग लागल्यानंतर अनिता परब यांनी वीज खांबावर इन्सुलेटर पेटत असल्याचे पाहिले होते. महावितरणने शॉर्टसर्किटने आग लागल्याची जबाबदारी झटकली होती. मंगळवारी दुपारी कनिष्ठ अभियंता ए. बी. यादव यांना घटनास्थळी ग्रामस्थांकडून धारेवर धरण्यात आले. पहिल्यांदा जबाबदारी झटकणार्‍या अभियंता यादव यांना संतप्त ग्रामस्थांनी इन्सुुलेटरचे जळालेले तुकडे दाखविले. त्याची प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर सदर आग शॉर्टसर्किटनेच लागल्याचे यादव यांनी मान्य केले. महसुल प्रशासनाचा पंचनामा झाल्यानंतर आठ दिवसांत प्रत्यक्षात नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.