Thu, Jun 27, 2019 09:52होमपेज › Konkan › ‘कृष्णा केमिकल्स’चे २८ कोटींचे नुकसान

‘कृष्णा केमिकल्स’चे २८ कोटींचे नुकसान

Published On: Mar 04 2018 1:42AM | Last Updated: Mar 03 2018 10:56PMचिपळूण : खास प्रतिनिधी

नजीकच्या गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा केमिकल्स अ‍ॅन्ड अ‍ॅन्टी ऑक्सिडंट कंपनीचे गोडावून आणि लवकरच कार्यरत होणारा एक प्‍लान्ट  आगीमध्ये जळून खाक झाला. या आगीत कंपनीचे तब्बल 28 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी दुपारी लागलेली आग मध्यरात्री नियंत्रणात आणण्यात यश मिळाले.

बारा अग्‍निशामक बंबांच्या सहाय्याने दहा तासांच्या मिशननंतर ही आग विझवण्यात यश आले. कंपनीच्या मालमत्तेचे नुकसान झाले असले तरी जीवितहानी झालेली नाही. प्रथमदर्शनी ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे पुढे आले आहे.

खडपोली येथील अडरेकर मोहल्ल्याजवळ कृष्णा अ‍ॅन्टिऑक्सिडंट कंपनीचे 2014 पासून गोडावून आहे. गेली दोन वर्षे या ठिकाणी नवीन प्‍लान्ट उभारण्याचे काम सुरू होते. होळीनिमित्त सुट्टी असताना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास शॉर्टसर्किटने अचानक आग लागली आणि धुराचे लोट आकाशात दिसू लागले. महसूल प्रशासनाने तत्काळ दखल घेत अडरेकर मोहल्ल्यामधील बारा कुटुंबांना परिसरात स्थलांतरित केले.  दुर्घटनेनंतर या भागात 10 तास कार्बनचा धूर पसरला होता. त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता होती. परंतु, शनिवारी मध्यरात्री आग विझल्यानंतर वातावरण निवळू लागले. शनिवारी सकाळी येथील ग्रामस्थ पुन्हा आपल्या घरामध्ये परतले. आता या भागातील वातावरण पूर्ववत झाले आहे. 

तहसीलदार,  सदस्यांचे योगदान

कंपनीला लागलेली आग विझवण्यात यश येत नव्हते. मात्र, तहसीलदार जीवन देसाई यांनी आत्मविश्‍वास दिल्यानंतर प्रथम प्रकाश पवार यांनी कंपनीच्या आवारात घुसण्याचे धाडस केले. त्यानंतर  जि. प. सदस्य विनोद झगडे यांनी कंपनीच्या आवारातील रसायनाने भरलेला एक टँकर व रिकामा टँकर कंपनीबाहेर काढण्याचे धाडस केले. यावेळी पं. स. सदस्य अबू ठसाळे, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, रघुनाथ पवार आदींनी आग विझवण्यात महत्त्वपूर्ण काम केले. तहसीलदार देसाई यांनी तब्बल बारा तास या ठिकाणी ठाण मांडून मदतकार्यात सहभाग घेतला.

या संदर्भात कंपनीचे व्यवस्थापक अशोक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या आगीमध्ये अकरा स्टोअरेज टँक तसेच रसायनाने भरलेले 1500 बॅरल व दोन हजार रिकामी बॅरल्स या आगीत जळाली. या ठिकाणी शनिवारी दोन सुरक्षा रक्षक कार्यरत होते. त्यांना गोडावूनमध्ये काहीतरी जळाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ अंतर्गत अग्‍निशमन यंत्रणा सुरू केली.

मात्र, आग भडकल्यानंतर वीजपुरवठा बंद झाला. शिवाय जनरेटर्सदेखील बंद झाल्याने आग अधिक भडकली. या आगीमध्ये एचपीईपील्यू, ईएक्स-450, तोफा, डीएफए हे रसायन जळाले आहे. कंपनीमधून हे रसायन मुंबई येथील ‘ओएनजीसी’ला तर काही प्रमाणात ‘एचपीसीएल’ व ‘बीपीसीएल’ला पुरवठा होत होता. पेट्रोकेमिकल्समध्ये या रसायनाचा समावेश आहे. मात्र, आगीमध्ये रसायन जळाले आहे.शॉट सर्किट होऊन कंपनीमधील अंतर्गत वायरिंगने पेट घेतला व ही वायर सर्व भागात पेटत गेली. त्यामुळे आग पसरली असे व्यवस्थापकांचे म्हणणे आहे.

चिपळूण न. प. चे दोन, आरजीपीपीएल दोन, महानिर्मिती पोफळी तीन, लोटे एमआयडीसी एक, फिनोलेक्सच्या दोन बंबांनी सातत्याने पाण्याचा मारा करून  ही आग  नियंत्रणात आणली. येत्या पंधरा दिवसांत कंपनीने पन्‍नास कोटी रुपये खर्च करून उभारलेला प्‍लॅन्ट नव्याने सुरू होणार होता. दुप्पट क्षमतेचा हा प्‍लॅन्ट कार्यान्वित करण्याची तयारी सुरू होती.  पूर्णत: स्वयंचलित स्वरूपाचा हा प्‍लॅन्ट होता. मात्र, आगीमुळे कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.  कोल्हापूर येथील फॅक्टरी इन्स्पेक्टर एस. एम. मोहिते यांनी आगीची पाहणी केली.

दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, प्रांताधिकारी कल्पना जगताप-भोसले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे, तहसीलदार जीवन देसाई, पोलिस निरीक्षक निशा जाधव यांनी भेट दिली. या शिवाय विविध पक्षांच्या राजकीय पुढार्‍यांनी कंपनीच्या नुकसानीची पाहणी केली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, सभापती पूजा निकम, शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, आ. सदानंद चव्हाण आदींनी भेटी दिल्या.