Thu, May 23, 2019 21:04
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › लोटेतील केन केमिकल कंपनीला भीषण आग

लोटेतील केन केमिकल कंपनीला भीषण आग

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 10:30PMखेड : प्रतिनिधी

तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील केन केमिकल्स या रासायनिक कंपनीत शनिवार (दि. 8) सकाळी 11 वा.च्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेचे निश्‍चित कारण समजू शकलेले नाही. या आगीत कंपनीतील सर्व साहित्य व यंत्रे जळून खाक झाली आहेत. चिपळूण तसेच लोटे येथील अग्‍निशमन दलाने तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. यामध्ये कोणत्याही प्रकारच जीवितहानी झाली नाही. दरम्यान, लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक कारखान्यांमध्ये सतत लागत असलेल्या आगीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये अग्निशमन केंद्रानजीक केन केमिकल्स कंपनीत पोटॅशियम परमॅग्नेट रसायनाची निर्मिती केली जाते. शनिवारी कारखान्यात कंपनीमध्ये नियमित कामकाज सुरू होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या एका भागातून अचानक धूर व आगीच्या ज्वाळा येऊ लागल्या. कंपनीमध्ये प्लास्टिकचे ड्रम मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने जलद गतीने पेट घेतला. काही समजण्याच्या आतच आगीने भीषण रूप धारण केले. यावेळी कंपनीतील कामगारांनी प्रसंगावधान राखून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. यावेळी कंपनीचे मालक कुंदन मोरे ही कंपनीमध्येच होते. त्यांनी तत्काळ नजीकच्या अग्निशमन व संबंधित यंत्रणेला संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

लोटे औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलासोबतच चिपळूण व खेड येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. खेड येथील मदत व खेड रेस्क्यू टीमच्या सदस्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. 

घटनेची माहिती मिळताच लोटे पोलिस दूरक्षेत्रातील सहायक पोलिस निरीक्षक पोळेकर व त्यांच्या सहकार्‍यांनी पाहणी केली. घटनास्थळाची पाहणी करून प्राथमिक अहवाल खेडचे पोलिस निरीक्षक अनिल गंभीर यांना पोळेकर यांनी दिला. आगीची भीषणता लक्षात घेऊन खेडचे पोलिस निरीक्षक अनिल गंभीर, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत लाड, उपनिरीक्षक धोंडे व सहकार्‍यांनी तत्काळ कंपनीला भेट दिली. सुरक्षिततेच्या द‍ृष्टीने कंपनी परिसराभोवती पोलिसांचे कवच तयार करून आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला व्यत्यय येऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली.
आग नियंत्रणात आल्यानंतर केलेल्या पाहणीत कंपनीमधील प्लास्टिक ड्रममध्ये ठेवण्यात आलेले रसायन, उत्पादनासाठी वापरण्यात येणारी यंत्र, कंपनीचे छप्पर व संपूर्ण इमारत आगीच्या भक्षस्थानी पडल्याचे आढळले.प्राथमिक अंदाजानुसार कंपनीचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगणयात आले. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.