Wed, Nov 13, 2019 12:06होमपेज › Konkan › उभादांडा येथे दुकानाला आग ; तीन लाखांचे नुकसान

उभादांडा येथे दुकानाला आग ; तीन लाखांचे नुकसान

Published On: Jun 13 2019 1:33AM | Last Updated: Jun 13 2019 1:33AM
वेंगुर्ले : शहर वार्ताहर

वेंगुर्ले-उभादांडा गणपती मंदिर नजीक वाघेश्‍वरवाडी येथील उदय नारायण शिरोडकर यांच्या किराणा मालाच्या दुकानाला आग लागून सुमारे 3 लाखांचे नुकसान झाले. बुधवारी पहाटे 5 वा. च्या सुमारास हा प्रकार घडला.

वाघेश्‍वरवाडी येथील अंकुश वेंगुर्लेकर व नाथा वेंगुर्लेकर यांना बुधवारी सकाळी 5 वा.त्यांच्या घराशेजारी असलेल्या उदय शिरोडकर यांच्या किराणा दुकानाला आग लागल्याचे निदर्शनास आले. वेंगुर्लेकर यांनी तत्काळ आग विझवण्यास सुरुवात केली व आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, या घटनेची माहिती दुकान मालक उदय शिरोडकर यांना दिली. या आगीत दुकानातील  साहित्य व किराणा माल जळून बेचिराख झाला. घटना समजताच सभापती सुनील मोरजकर,  ग्रा. पं. सदस्य तिरोडकर, उभादांडा तलाठी सौ. नीलम सावंत, पोलिस पाटील विजय नार्वेकर, कोतवाल संजय नार्वेकर, हितेश धुरी, बाळा आरावंदेकर आदींनी पाहणी केली. 4 दिवसांपूर्वीच शिरोडकर यांनी दुकानाची डागडुजी करून नवीन किराणा माल भरला होता. या अचानक लागलेल्या आगीत दुकानासहित सर्व किराणा माल जळून खाक होऊन त्यांचे सुमारे 3 लाखांचे नुकसान झाले. 

उदय शिरोडकर यांना  वेंगुर्ले भाजपच्यावतीने  5 हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली. भाजपा तालुकाध्यक्ष प्रसन्‍ना देसाई, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, शक्‍ती केंद्र प्रमुख नीलेश मांजरेकर, मच्छिमार नेते दादा केळुसकर, ग्रा. पं.सदस्य शिवाजी पडवळ व दयानंद खर्डे, बुथप्रमुख प्रकाश मोटे, आनंद मेस्त्री, हेमंत आडारकर, माजी सरपंच शामसुंदर मुननकर, आंबा बागायतदार नंदकिशोर पेडणेकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

या आगीचे नेमके कारण समजले नाही. विशेष म्हणजे या दुकानात वीज नसल्याने शॉटसर्किट होऊन आग लागण्याचा प्रश्‍नच नाही. त्यामुळे आगीचे नेमके कारण काय? याबद्दल आश्‍चर्य व्यक्‍त केले जात होते.