Thu, Jun 27, 2019 12:35होमपेज › Konkan › फोनवरून घातला जातोय आर्थिक गंडा

फोनवरून घातला जातोय आर्थिक गंडा

Published On: May 15 2018 1:35AM | Last Updated: May 14 2018 10:58PMदेवरूख : प्रतिनिधी

बँकेचा मॅनेजर बोलतोय, असे भासवून एटीएम कार्डचा पासवर्ड मिळवून लाखो रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे धक्‍कादायक प्रकार पुढे येत आहेत. जिल्ह्यातील अनेक बँक ग्राहकांच्या बाबतीत हा प्रकार घडत आहे. या प्रकाराने मात्र आर्थिक फसवणूक झालेल्या ग्राहकांवर डोक्याला हात लावण्याची वेळ येत आहे. आपल्या वैयक्‍तिक बँक खात्यासंबंधीची कोणतीही माहिती बँक ग्राहकांनी कोणालाही देऊ नये, असे आवाहन देवरूख पोलिस ठाण्याद्वारे करण्यात आले आहे.

फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी बँकेमार्फत ग्राहकांना फसवणुकीपासून सतर्क राहण्याच्या वारंवार सूचना देण्यात येतात. तसेच वैयक्‍तिक बँक खात्याची माहिती अनोळखी व्यक्‍तीला सांगू नका, असेही बँकेकडून ग्राहकांना स्पष्टपणे सांगितले जाते.

असे असतानाही काहीजण आपण बँकेतून अधिकारी बोलत असल्याचे भासवून आपल्या बँक खाते व एटीएम कार्डमध्ये बिघाड असल्याचे सांगतात. बँक खाते नंबर व एटीएम कार्डचा पासवर्ड नंबर त्वरित द्या, अशाप्रकारचे बनावट फोन येतात. परंतु, असे फोन आल्यानंतर कोणतीही खातरजमा न करता केवळ त्यांच्या बोलण्यावर भुलून आपल्या बँक खात्याचा नंबर व एटीएम कार्डचा पासवर्ड नंबर ग्राहक देत असतात.

याच संधीचा फायदा घेऊन फोन करणार्‍या व्यक्‍तीकडून बँक खात्यातील रक्‍कम हातोहात लांबवली जाते. मात्र, नंतर त्यांच्या मोबाईलवर पैसे काढल्याचा मेसेज आल्यावर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येते. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. 
असे प्रकार जिल्ह्यातील अनेक बँक ग्राहकांच्या बाबतीत घडलेआहेत. आपली आर्थिक फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच काहीजणांना तर मानसिक धक्‍काच बसत आहे. या धक्क्यातून सावरणे त्यांना कठीण होऊन बसले आहे. अनोळखी व्यक्‍तींच्या भुलथापांना बळी पडून हक्‍काच्या पैशांवर अशाप्रकारे डल्ला मारला जात आहे.

काहीजण मोठ्या धिटाईने कायद्याचा आधार घेत गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी आटापिटा करतात. मात्र, त्यांच्या या आट्यापिट्याला यश मिळत नाही. त्यामुळे गप्पच राहिलेले बरे, असे समजून गेलेल्या पैशांवर अनेकजण पाणी सोडत आहेत.

बँक खात्यातून अज्ञात व्यक्‍तींनी पैसे हडप केल्याच्या तक्रारीही देवरूख पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आल्या आहेत. तर गत दोन वर्षांपासून अशाप्रकारच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे बँक ग्राहकांनी स्वत: अशा घटनांपासून दूर राहण्यासाठी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.

ग्राहकांनी खबरदारी घ्यावी

बँक ग्राहकाने अनोळखी व्यक्‍तीला बँक खाते नंबर व एटीएम पासवर्ड नंबर दिलेला असल्यामुळे पोलिसांना तपास करताना बर्‍याच अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे बँक ग्राहकांनी अशा घटना घडू नये, यासाठी स्वत: खबरदारी घेतली पाहिजे व बँक अधिकारी बोलतोय असा फोन आल्यास त्या व्यक्‍तीला आपल्या बँक खात्याची माहिती न देता थेट ज्या बँकेत आपले खाते असेल त्या बँकेत जाऊन माहिती द्यावी, असे आवाहन देवरूख पोलिस ठाण्याचे निरीक्षक एस. एल. पाटील यांनी केले आहे.