Tue, Feb 19, 2019 06:30होमपेज › Konkan › पॅनकार्ड क्‍लब्जप्रकरणी अर्थमंत्र्यांकडून ‘सेबी’ला विचारणा

पॅनकार्ड क्‍लब्जप्रकरणी अर्थमंत्र्यांकडून ‘सेबी’ला विचारणा

Published On: Dec 23 2017 2:07AM | Last Updated: Dec 22 2017 8:48PM

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

संसदेच्या अधिवेशनादरम्यान गुरूवारी भाजप व शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेऊन पॅनकार्ड क्‍लब्ज कंपनीच्या बाधीत गुंतवणुकदारांच्या व्यथा मांडल्या. पॅनकार्ड कंपनीत अडकलेला गुंतवणुकदारांचा पैसा कधी मिळणार? सेबीकडून लिलावप्रक्रिया पारदर्शकपणे राबविली जाणार का? असे प्रश्‍न विचारीत सर्वच खासदारांनी याविषयी अर्थमंत्र्यांकडे संयुक्‍त मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अर्थमंत्र्यांनी तातडीने सेबीचे प्रमुख अजय त्यागी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून येत्या आठ दिवसांत अहवाल देण्याची सूचना केली. 

स्वतः अर्थमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घातल्याने हा प्रश्‍न लवकर निकाली निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रशक्‍ती इन्व्हेस्टर्स कोऑर्डिनेशन कमिटीच्या दीड वर्ष सुरू असलेल्या आंदोलनाला हे मोठे यश मिळाले असल्याचे समितीचे सचिव शहाजी आरसूळ यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

खा. दिलीप  गांधी, कर्नाटकचे खासदार सुरेश आंगडी, खा. आनंदराव अडसूळ, खा. चंद्रकांत खैरे, खा. गजानन कीर्तीकर, खा. अरविंद सावंत, खा. भावना गवळी यावेळी उपस्थित होत्या. लिलाव प्रक्रियेत गुंतवणुकदारांच्या वतीने प्रतिनिधी सामावून घेणे, लिलावातून येणार्‍या पैशातून गुंतवणुकदारांना प्रथम प्राधान्य देणे, गुंतवणुकदारांची मॅच्युरिटी सर्टीफिकेट सेबीने जमा करून घेणे, कंपनीच्या सर्व 84 मिळकती तत्काळ सील करणे अशा सुमारे 13 मागण्या निवदेनाद्वारे अर्थमंत्र्यांकडे करण्यात आल्या. राष्ट्रशक्‍तीच्यावतीने संघटनेचे संस्थापक ज्ञानेश्‍वर दारवटकर यांनी ही अर्थमंत्र्यांकडे बाजू मांडली.