Sun, Dec 15, 2019 03:27होमपेज › Konkan › जिंकण्यासाठीच लढा : नीलेश राणे

जिंकण्यासाठीच लढा : नीलेश राणे

Published On: Mar 23 2019 1:15AM | Last Updated: Mar 23 2019 12:02AM
रत्नागिरी : प्रतिनिधी

गेली पंधरा वर्षे विरोधकांनी तुमची केवळ फसवणूक केली आहे हे लक्षात ठेवा, आजची लढाई ही शेवटची लढाई आहे, विरोधक कोणत्याही बाजूने येऊ शकतो, गनिमी काव्याच्या नावाखाली साम दाम दंड भेद वापरू शकतो. चार दिवस डोळ्यात तेल घालून काम करा आणि कुवारबांव ग्रामपंचायतीचा गड काबिज करा, मी तुमच्या सोबत आहे, असे अभिवचन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी कुवारबाववासियांना दिले आहे.

येत्या २४ मार्च रोजी कुवारबाव ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यामध्ये ग्रामस्थांनी पक्षविरहित कुवारबांव ग्रामविकास आघाडी स्थापन केली असून त्याला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. यावेळी या आघाडीतर्फे निलेश राणे यांना प्रचारासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी निलेश राणे म्हणाले, कुवारबांव हे रत्नागिरी शहराचे उपनगर आहे. याच ग्रामपंचायतीच्या रखडलेल्या विकासावर, ग्रामस्थांच्या मुलभूत हक्कांवर त्यांनी बोट ठेवले. ते म्हणाले, पाणी हा प्रत्येकाचा मुलभूत हक्क आहे. परंतु आपण 21 व्या शतकात वावरत असतानाही केवळ कुवारबांवच नव्हे तर जयगडसारख्या अन्य ग्रामपंचायतीही या हक्कापासून वंचित आहेत. ग्रामस्थांच्या  हक्कासाठी काम करणार्‍यांना विरोध केला जात आहे. इथला विकास रखडवून तुम्हाला त्यांच्यावर अवलंबून ठेवण्याची ही त्यांची खेळी असल्याच राणे यांनी सांगितले. 

आजही इथले आणि तालुक्यातही अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित असताना या मंडळींनी तुमच्या मतांचा वापर आपल्या व्यवसायासाठी केला आहे. मात्र राजकारण बिझनेसप्रमाणे करणारी ही मंडळी कधीच कुणाची झालेली नाहीत हा इतिहास आहे.  अशांपासून आत्ताच सावध व्हा, अनेक भूलथापा, अनेक आमिषे घेऊन तुमच्यासमोर येतील, तुम्हाला भीती दाखवतील, आवाज चढवून दाखवतील परंतु यापेक्षा जास्त हे काहीच करू शकत नाहीत हेही लक्षात ठेवा असे सांगतानाच, मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे आणि कायम राहीन, कुवारबांवच्या विकासासाठी माझे योगदान सर्वात मोठे असेल असे प्रतिपादन निलेश राणे यांनी यावेळी केले.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश सावंत, राष्ट्रवादीचे कुमार शेट्ये, तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर, उद्योजक सुधाकर सुर्वे, माजी पंचायत समिती सभापती निलेश लाड उपस्थित होते. यावेळी राजेश सावंत यांनी कुवारबावमधील विविध समस्या मांडताना त्या कशा रखवडल्या गेल्या आहेत ते आपल्या मनोगतामध्ये मांडले तर निलेश राणे यांच्या येण्यामुळे ज्यांना जे समजायचे आहे ते नक्कीच समजेल, असे प्रतिपादन केले. यावेळी वडार समाजाच्यावतीने नागेश पाथरवट यांनी निलेश राणे यांचा सन्मान केला आला.

आमदारासाठी खासदारकी पणाला लावली

माझा मित्र म्हणवणार्‍या आमदारासाठी मी माझी खासदारकी पणाला लावली, राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी १२ खात्यांचा मंत्री करून विश्वास दाखविला, स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, राजेश सावंत यांनी त्यांना आमदार बनविण्यासाठी आपले करीयर पणाला लावले. मात्र या सगळ्यांना बाजूला करून आमदारांनी मंत्रीपदासाठी शिवसेना आणि मातोश्रीच्या जवळ असलेले खा. विनायक राऊत यांच्याशी जवळीक साधली.  उद्या भाजपमध्येही येण्याची यांची तयारी असेल.