होमपेज › Konkan › सर्वसामान्यांच्या मूलभूत हक्‍कांसाठी लढा द्या : अ‍ॅड. ज्ञानेश खरात

सर्वसामान्यांच्या मूलभूत हक्‍कांसाठी लढा द्या : अ‍ॅड. ज्ञानेश खरात

Published On: Dec 11 2017 1:31AM | Last Updated: Dec 10 2017 9:11PM

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

सर्वसामान्य जनतेला तिचे मुलभूत अधिकार मिळवून देणे, शासकीय कायदे व योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविणे हा अखिल भारतीय ह्युमन राईटस् संस्थेचा मुख्य उद्देश आहे. यादृष्टीने प्रत्येक पदाधिकार्‍याने काम करावे असे आवाहन अ.भा. मानवाधिकार संघटनेचे राज्य अध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानेश खरात यांनी केले. संघटनेच्या जिल्हा शाखेच्यावतीने आयोजित जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

अ‍ॅड. खरात यांनी मानवी हक्क व मानवाधिकार संघटना याविषयी विवेचन केले. प्रामुख्याने दुसर्‍या महायुध्दानंतर उद्भवलेल्या सामाजिक व राजकीय अस्थिरतेतून या उपक्रमाची गरज जगाला भासली. त्यानंतर 10 डिसेंबर 1948 रोजी जगातील 128 देशांनी मिळून जागतिक मानवी हक्क आयोगाची स्थापना केली. भारतात 1993 पासून मानवी हक्क कायदा लागू झाला. यानंतर अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेची स्थापना महाराष्ट्रात करण्यात आली. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व जनता यामधील दुवा म्हणून ही संस्था काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

समाजातील प्रत्येक व्यक्तीला घटनेने दिलेल्या त्याच्या मुलभूत हक्कांबाबत जाणीव करून देणे हा संघटनेचा उद्देश आहे. याबरोबरच जनतेची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी फौजदारी कायदा, ग्राहक संरक्षण कायदा, महिला अत्याचार विरोधी कायदा, बालक व कामगार विरोधी कायदा, महसूली तसेच भूसंपादन कायदा अशा प्रकारे राज्य घटनेच्या सर्वच कायदेविषयक बाबीत नागरीकांना न्याय मिळवून देण्याचे काम संस्था करते. ज्यावेळी पोलिस किंवा संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून नागरीकाला न्याय देण्यास विलंब होतो त्यावेळी मानवाधिकार संघटनेचे काम सुरू होते असे ते म्हणाले.

संघटनेने कशा प्रकारे काम करावे याविषयी मार्गदर्शन करत त्यांनी माहिती पत्रकाचे वाटप केले. संघटनेचे राज्य सचिव राणोजी चव्हाण, जिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर, सचिव संजय गवस तसेच राज्य संघटनेचे नंदकुमार परदेशी, नाना कोळी, श्याम काकडे, रमेश पवार, श्री. मोरे, जिल्हा संघटनेच्या कायदेविषयक सल्लागार अ‍ॅड. निकिता म्हापणकर आदींसह सदस्य व नागरीक उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर संघटनेच्यावतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.