Thu, Dec 12, 2019 09:34होमपेज › Konkan › खेम धरण गळतीकडे पंधरा वर्षे दुर्लक्षच

खेम धरण गळतीकडे पंधरा वर्षे दुर्लक्षच

Published On: Jul 18 2019 1:56AM | Last Updated: Jul 18 2019 12:07AM
दापोली : प्रवीण शिंदे 

तालुक्यातील हर्णै येथे 1974 साली बांधण्यात आलेल्या खेम धरणाकडे अद्याप दुर्लक्ष केलेल्या शासनाने तिवरे दुर्घटनेनंतर  दुरुस्तीचा घाट घातला आहे. धरण बांधकामानंतर चार दशकाहून अधिक काळ या धरणाच्या दुरुस्तीकडे शासनाने लक्ष दिले नाही. 15 वर्षांपासून धरणाला गळती सुरू असून या गळतीत आता मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

खेम धरणावरून हर्णे आणि पाजपंढरी गावाची नळपाणी योजना असून, यातील हर्णै तालुक्यातील सर्वात मोठी नळपाणी योजना आहे. या दोन्ही गावांची वाढती लोकसंख्या आणि धरणाला लागलेली प्रचंड गळती यामुळे येथील लोकांना धरणातील पाणी साठा पुरत नाही. तालुक्यातील बांधतीवरे जोग नदीवर बंधारा बांधून तेथील पाणी या लोकांना पुरविले जाते.

धरण बांधकामापासून हे धरण वादात सापडलेले आहे. धरणाचे बांधकाम सदोष असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते. धरण दुरूस्त व्हावे म्हणून हर्णै ग्रामपंचायतीने गेली 15 वर्ष शासनाकडे सातत्याने पाठपुरावा चालू ठेवला आहे. मात्र, तिवरे दुर्घटनेनंतर 15 वर्षांनी शासनाला जाग आली आहे. अनेकवेळा राजकीय नेत्यांनी खेम धरण पाहणीच्या नावाखाली पावसाळी सफर केली. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी या धरण दुरुस्तीचा सातत्याने पाठपुरावा करून 2 कोटी 45 लाखाचा निधी मंजूर करून दिला आहे. या धरणाचे काम जलसंपदा विभागाकडून करण्यात येणार आहे.

या धरणाच्या ठिकाणी अनेक पर्यटक आणि स्थानिक मोठ्या संख्येने आंघोळीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मात्र, धरणाला लागलेली गळती आणि कमकुवत झालेली धरणाची भिंत यामुळे या ठिकाणी आंघोळ करू नये असा फलक लावण्यात आला आहे. मात्र, तरीही काही हौशी पर्यटक व स्थानिक जीव धोक्यात घालून तेथे जात आहेत. यासाठी शासनाकडून जागता पहारा हवा अशी चर्चा नुकत्याच झालेल्या हर्णे येथील अधिकारी व येथील ग्राम पंचायत सदस्य, सरपंच यांच्या बैठकीत झाली. मात्र, तरीही या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने शासनाकडून काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. सुरक्षेच्या गोष्टी फक्‍त कागदावर रंगविण्यात आल्या आहेत. 

अतिवृष्टीमुळे हे धरण तुडुंब भरुन वाहते. त्यात धरणाची वरची बाजू कमकुवत झाली असून अशावेळेस धरणाच्या वरील दगड ढासळू शकतात. यामुळे अनेकांच्या जीवितास धोका होऊ शकतो. त्यामुळे येथे सुरक्षा असणे आवश्यक आहे. धरणाच्या खालील बाजूस असणार्‍या अडखळ गावातील चार वाडीतील लोक तिवरे घटनेनंतर भीतीच्या छायेत असून धरण दुरुस्त होइपर्यंत ही भीती कायम राहणार आहे. त्यामुळे शासनाने गंभीर दखल घेऊन हे काम तातडीने करणे गरजेचे आहे.

गळतीने पाणीसाठा नाही

या धरणाची पाणी क्षमता 13.50 एम.सी.एफ.टी. आहे. मात्र, धरणाला गळती असल्याने धरणात पाणी शिल्लक राहत नाही. त्यामुळे हर्णै आणि पाज या दोन गावांची पाण्यासाठी वणवण होते. मात्र, धरण दुरूस्तीनंतर धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊन येथील लोकांची तहान भागेल अशी माहिती माजी सरपंच अस्लम अकबानी यांनी दिली.