Sun, Aug 18, 2019 20:56होमपेज › Konkan › केरळीयन कामगार ‘निपाह’चे वाहक ठरण्याची भीती

केरळीयन कामगार ‘निपाह’चे वाहक ठरण्याची भीती

Published On: Jun 04 2018 1:05AM | Last Updated: Jun 03 2018 8:45PMसावंतवाडी : शहर वार्ताहर

जिल्ह्यातील केरळीयनांच्या बागेत कामासाठी केरळहून आणले जाणारे कामगार,जीवघेण्या निपाहच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.  सध्या केरळमध्ये निपाह व्हायरसचा झालेला उद्रेक पाहता, जिल्ह्यात कामगार म्हणून येणारे केरळीयन या व्हायरसचे वाहक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.  याबाबत आरोग्य विभागाबरोबरच जिल्हा प्रशासनानेही आवश्यक ती खबरदारी घेण्याचीर गरज आहे. 

यापूर्वी कर्नाटकातून आलेल्या माकड तापाने जिल्ह्यात अनेक बळी घेतले आहेत. आता केरळमध्ये उच्छाद मांडलेला निपाह हा जीवघेणा व्हायरस जिल्ह्याच्या वेशीवर दाखल झाला आहे. वटवाघळ हा या व्हायरसच्या वहनाचा मुख्य स्त्रोत असल्याने तसेच या जिल्ह्यातील वटवाघळांची संख्या पाहता,येतेही निपाहच्या प्रादुर्भावाची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, इतर कारणांमुळेही या जिल्ह्यात निपाहच्या प्रादूर्भावाची शक्यता असून,यात या जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने असलेल्या केरळीयन कामगार हे एक प्रमुख कारण आहे.

सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात परप्रांतीय केरळीयनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिसरातील शेकडो एकर जमीन केरळीयनांच्या ताब्यात असल्याने या जमिनीत केरळीयनांनी मोठ्या प्रमाणात रबर, केळी, अननस व अन्य उत्पादनाची लागवड केली आहे. या लागवडीच्या देखभालीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असल्याने हे जमीन मालक केरळहून मोठ्या प्रमाणात मजूर या भागात आणत आहेत. सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात हजारो हेक्टर जमीन आज केरळीयनांच्या ताब्यात आहे.या भागातील डोंगर माथ्यावरील जमिनी कमी भावाने खरेदी करून या जमिनीमध्ये रबर, केळी, अननस आदींच्या बागा फुलविल्या जात आहेत.

यात या केरळीयनांचा सर्वाधिक कल रबर लागवड करण्याकडे आहे. डोंगर माथ्यावरील बहुतांश जमिनी केरळीयनांनी घेऊन त्यात प्लँटेशन करण्यास सुरवात केल्याने या ठिकाणी काम करणार्‍या मजुरांची कमतरता येथील केरळीयनांना जाणवत असते. त्यामुळेच या भागात काम करण्यासाठी दररोज शेकडो केरळीयन मजुरांची ये-जा वाढली आहे. या केरळीयन मजुरांची कमतरता प्रकर्षाने जाणवत असल्याने केरळीयन सावकारांनी स्थानिक युवकांना हाताशी धरून कमीशनवर मजूर पुरवणार्‍या युवकांची एक टोळीच तयार केली आहे.

उन्हाळी व पावसाळी हंगामात  हे केरळीयन बागायतदार हजारोंच्या संख्येने केरळीयन कामगार येथे आणतात.या कामगारांची नोंदही पोलिसात केली जात नाही,तसेच बागेत काम करणार्‍या अनेक केरळ कामगारांचा गूढ मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.आता हे केरळीयन कामगार जिल्हात ‘निपाह’चे वाहक   ठरू शकतील,अशी भीती आहे.केरळ राज्यातील अनेक भागात ‘निपाह’ संसर्गजन्य विषाणूने धुमाकूळ घातला आहे. वटवाघळाच्या संक्रमणातून हा आजार पसरत आहे. हा संसर्गजन्य व्हायरस असल्याने केरळमधून लागण होऊन आलेल्या कामगारांच्या माध्यमातून याचा येथे प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे ज्या कोझीकोडे या भागात या व्हायरसचा जास्त प्रभाव आहे, तेथूनच जास्त केरळीयन येथे येतात.या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने काळजी घेण्याची गरज आहे.

सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांना सर्वाधिक धोका

सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात हजारोंच्या संख्येने केरळीयन कामगार आहेत.दोडामार्ग तालुक्यात शिरंगे,सावंतवाडी तालुक्यातील घारपी,उडेली,फणसवडे,सरमळे,बावळाट,ओठवणे,असनिये या भागात केरळीयनांची मोठ्या बागा आहेत.बर्‍याच बागा या गाव वस्तीपासून नजीक असल्याने एखादा निपाह संसर्गित केरळीयन ग्रामस्थांसाठी धोकादायक ठरू शकतो.