Thu, Apr 18, 2019 16:08होमपेज › Konkan › कँटरच्या धडकेत पिता-पुत्र ठार

कँटरच्या धडकेत पिता-पुत्र ठार

Published On: Mar 07 2018 10:43PM | Last Updated: Mar 07 2018 10:43PMकुडाळ : वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गावर साळगाव माऊली मंदिर बस स्टॉपनजीक मंगळवारी रात्री दोन मोटारसायकना भरधाव कँटरने धडक दिली. यात पिता-पुत्राचा मृत्यू झाला. तर दोघांना गंभीर दुखापतझाली. त्यांना बांबुळी येथे अधिक उपचारासाठी  हलविण्यात आले आहे. हा अपघात ठेकेदार कंपनीने  कामादरम्यान  योग्य त्या उपाययोजना न केल्याने घडल्याचा आरोप करत  स्थानिक ग्रामस्थांनी सुमारे एक तास महामार्ग रोखला. यावेळी पोलिस  व ग्रामस्थांमध्ये बाचाबाचीही झाली. 

शामलाल कल्‍लोजी विश्‍वकर्मा (वय 55, रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. तेर्सेबांबर्डे) ओरोस येथे सुतारकाम  आटोपून  तेर्सेबांबर्डे येथे मोटारसायकलने येत होते. यावेळी मुलगा प्र्रकाश शामलाल विश्‍वकर्मा त्यांच्यासोबत (13) होता. साळगाव माऊली मंदिर बस थांबा येथे आल्यावर समोरून येणार्‍या एका कँटरने विश्‍वकर्मा यांच्या  मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यानंतर अन्य एक मोटारसायकलस्वार गणेश दिगंबर धुरी (24, रा. साळगाव-मळावाडी) यांच्या मोटारसायकलला ठोकर दिली. या मोटारसायकलच्या मागे सिद्धेश दत्तगुरू सावंत (19, रा. साळगाव-मळावाडी) हा युवक बसला होता. 

यामध्ये गणेश धुरी व सिद्धेश सावंत हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना येथील ग्रामस्थ प्रमोद सावंत, अंकुश बांबर्डेकर, नाथा गवस यांनी मोटारसायकलवरूनच कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. विविध  कारणांमुळे महामार्ग अपघातांना कारणीभूत ठरत आहे,  असा आरोप करत महामार्ग वाहतूक सुमारे एक तास रोखून धरली.

महामार्गावर चिमुरड्याचा आक्रोश

अपघातात मृत झालेले शामलाल विश्‍वकर्मा व प्रकाश विश्‍वकर्मा हे आपल्या परिवारासह तेर्सेबांबर्डे येथे भाड्याने राहतात. अपघात स्थळापासून  ते राहत असलेली खोली अवघ्या शंभर मीटरवर आहे. अपघाताचे वृत्त समजताच त्यांची पत्नी व चिमुरडी मुले घटनास्थळी धावत आली. यावेळी या चिमुरड्या मुलांनी महामार्गावर केलेला आक्रोश काळीज हेलावणारा होता.