Tue, Apr 23, 2019 00:35होमपेज › Konkan › स्थानिक शिक्षक भरतीसाठी मुंबईत उपोषण

स्थानिक शिक्षक भरतीसाठी मुंबईत उपोषण

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 10:22PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्हा पातळीवर शिक्षक भरती झालीच पाहिजे... ‘माझा जिल्हा माझी नोकरी का देऊ दुसर्‍याला माझी भाकरी’... अशा घोषणा देत रत्नागिरीतील डीएड्, बीएड् धारकांनी मुंबई येथील आझाद मैदानात उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले. शिक्षक भरती जिल्हा स्तरावर करून त्यात स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली.

2010 ची भरती राज्य स्तरावरून झाल्याने चुकीच्या धोरणाचा फटका रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील डीएड्, बीएड् धारकांना बसला होता. त्यावेळी रत्नागिरीत 1157 जागा रिक्‍त असताना केवळ 37 स्थानिक उमेदवार भरती झाले होते. त्यानंतर आठ वर्षे अद्याप शिक्षक भरती झालेली नाही. आता यापुढेही शिक्षक भरती राज्यस्तरावरून होणार असून तेच जुने धोरण सध्याचे शासन रेटू पाहत आहे. या धोरणाविरोधात संतप्त झालेल्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील डीएड, बीएड् धारकांनी मुंबईत उपोषण करून आपल्यावरील अन्याय व्यक्‍त केला.

यावेळी संघटनेचे दीपक भरणकर यांनी सांगितले की, रोजगार हमी योजनेत स्थानिकांना दगड फोडण्यासाठी प्राधान्य देता, मग शिक्षक होण्यासाठी स्थानिकांना आरक्षण का दिले जात नाही? शासनाच्या चुकीच्या धोरणांचा फटका येथील तरुणांना बसतोय. भावी शिक्षकांना न्याय द्या, अशी मागणी भरणकर यांनी केली.

सिंधुदुर्ग, रत्नागिरीत नोकरीसाठी यायचे आणि तीन वर्षांनंतर जिल्हा बदली करून निघून जायचे, हे वास्तव सध्या कोकणात आहे. यामुळे कोकणातल्या शाळा शिक्षकांविना ओस पडताहेत. विद्यार्थ्यांच्या होणार्‍या नुकसानीला जबाबदार कोण? शिक्षक म्हणून रत्नागिरीत यायचे असेल तर निवृत्तीपर्यंत  रत्नागिरीत नोकरी करायची तयारी ठेवा अन्यथा जिह्यात पाय ठेवू नका, असे संदेश रावणंग यांनी ठणकावून सांगितले. 

जिल्हा बदल्या करण्याचे आणि परजिल्ह्यांतील शिक्षकांचे लाड करण्याचे उद्योग आता थांबवा. परजिल्ह्यातल्या शिक्षकांचे हट्ट पुरवताना इथला स्थानिक तरूण कायमचा उद्ध्वस्त झालाय. याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. शासनाने आणि आम्ही ज्यांना निवडून दिलेय त्यांनी यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावेत, असे संदीप गराटे यांनी मनोगतातून सांगितले. कोकणातल्या दुर्गम भागात नोकरी करायची मानसिकता नसेल तर मग परजिह्यांतील शिक्षकांना नेमणुका देता कशाला? असा सवाल यावेळी प्रभाकर धोपट यांनी केला. 

आझाद मैदानावर या उपोषणाची सुरूवात 10 वा. करण्यात आली. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कल्पेश घवाळी, राजेश इंगळे, प्रभाकर धोपट, सुदेश निवळकर, योगेश वीर, हेमंत पाडावे, विनायक घाणेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

या आंदोलनाला नवी मुंबईचे उपमहापौर अविनाश लाड, रत्नागिरी पं.स.चे सदस्य सुशांत पाटकर, लांजा भाजपचे तालुकाध्यक्ष यशवंत वाकडे, भूषण बरे, रवींद्र मटकर, मनोहर पवार यांनी भेट दिली.