Fri, Jul 19, 2019 17:45होमपेज › Konkan › भावाच्या मृत्यूप्रकरणी दुसर्‍या दिवशीही उपोषण सुरूच

भावाच्या मृत्यूप्रकरणी दुसर्‍या दिवशीही उपोषण सुरूच

Published On: Jan 27 2018 11:22PM | Last Updated: Jan 27 2018 11:19PMरत्नागिरी : प्रतिनिधी 

खेड येथे झालेल्या अपघातात मोठ्या भावाचा मृत्यू घातपाती असताना या प्रकरणी खेडच्या पोलिस निरीक्षकांनी यामध्ये कारवाई करण्यासा टाळाटाळ केल्याचा आरोप करीत मुंबईतील संदेश मोरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रजासत्ताकदिनी उपोषण सुरू केले आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत दखल न घेतल्याने शनिवारीही मोरे यांचे उपोषण सुरूच होते.

या संदर्भात मोरे यांनी गतवर्षी स्वातंत्र्यदिनीही उपोषण करुन प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली होती. दुचाकीवरुन रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथे जाताना संदेश मोरे यांचे बंधू योगेश मोरे यांच्या दुचाकीला खेडमध्ये भोस्ते घाटात एका वळणावर अपघात झाला होता. दुचाकीला ट्रकची धडक बसल्याने  हा अपघात झाला होता. त्यावेळी ट्रकचालकाने अपघातानंतर मदत करण्याऐवजी ट्रक तसाच योगेशच्या  अंगवरून नेल्याचा आरोप संदेश मोरे यांनी केला आहे.

हा अपघात दि. 12 एप्रिल 2017 रोजी घडला होता. या प्रकरणाची चौकशी करणार्‍या खेड तत्कालीन पोलिस निरीक्षकांनी याबाबत योग्य ती कार्यवाही न केल्याने संबंधित ट्रकचालक फरार झाला. याबाबत गेल्या वर्षी 15 ऑगस्ट 2017 रोजी उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी संबंधित ट्रकचालक आणि  खेडचे तत्कालीन पोलिस निरीक्षक दाभाडे यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही कारवाई न झाल्याने संदेश मोरे आणि कुटुंबियांनी पुन्हा शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोेषण सुरू  केले. दरम्यान, शनिवारी या उपोषणाचा दुसरा दिवस होता. सायंकाळी उशिरापर्यंत हे उपोषण सुरूच होते.