Fri, Feb 22, 2019 03:25होमपेज › Konkan › शेतकर्‍यांना तलाठ्यांचे सहकार्य मिळेना : नागले

शेतकर्‍यांना तलाठ्यांचे सहकार्य मिळेना : नागले

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 04 2018 10:32PMराजापूर : प्रतिनिधी

काही तलाठ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे ‘एमआरईजीएस’ अंतर्गत सुरू असलेल्या फळबाग लागवड योजनेला राजापूर तालुक्यात खीळ बसत आहे. काही तलाठ्यांकडून महिनोंमहिने सातबारा, आठ ‘अ’ उतारे मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जि. प. चे माजी शिक्षण सभापती दीपक नागले यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

शासनाच्या रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीला प्राधान्य देण्यात आले आहे. गतवर्षीपासून जिल्हाधिकारी यांच्या विशेष पुढाकाराने रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी या योजनेची गती मंदावल्याचे चित्र राजापूर तालुक्यात पहायला मिळत आहे. राजापूर तालुक्यातील काही तलाठ्यांचे असहकार्य व मनमानी 
यामुळेच फळबाग लागवड योजनेला खीळ बसल्याचा आरोप नागले यांनी या निवेदनाद्वारे केला आहे.

या योजनेसाठी आवश्यक असणारे सातबारा व 8 ‘अ’ उतारे तलाठ्यांनी शेतकर्‍यांना मोफत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, मोफत तर दूरच परंतु ग्रामपंचायतीकडून मागणी करून काही महिने लोटले तरी काही तलाठ्यांकडून सातबारा, 8 ‘अ’ मिळत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीकडे प्रस्तावच दाखल झालेले नसल्याचे नागले यांनी या निवेदनात नमूद केले आहे. वारंवार फेर्‍या मारूनही ना सातबारा मिळत ना तलाठी, अशी स्थिती तालुक्यात आहे. त्यामुळे तलाठ्यांची कार्यालयातील उपस्थितीही चिंतेची बाब बनल्याचे नागले यांनी यामध्ये नमूद केले आहे.

यापूर्वी शेतकर्‍यांना कृषी विभागाकडूनच लागवडीसाठी रोपे मिळत होती. मात्र, आता शेतकर्‍यांनी स्वतः रोपे खरेदी करावयाची आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी रोपे खरेदी केली असून काही तलाठ्यांच्या अशा धोरणामुळे शेतकर्‍यांचे प्रस्ताव वेळेत न झाल्यास त्यांना अनुदानापासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्येही तलाठ्यांबद्दल असंतोष निर्माण झाला आहे. शेतकर्‍यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागले यांनी केली आहे.