Thu, Nov 15, 2018 22:13होमपेज › Konkan › शेतकर्‍यांची कर्जासाठी अडवणूक करणार्‍या बँकांवर कारवाई

शेतकर्‍यांची कर्जासाठी अडवणूक करणार्‍या बँकांवर कारवाई

Published On: Jun 29 2018 12:06AM | Last Updated: Jun 28 2018 10:52PMरत्नागिरी : प्रतिनिधी

अनेक बँकांकडून शेतकर्‍यांना आगामी हंगामासाठी खरीप पीक कर्ज देताना गती दिली जात नाही. त्यामुळे पात्र असणारे शेतकरी, पहिल्यांदाच कर्ज घेणारे शेतकरी व अन्य शेतकर्‍यांना अडवणूक करणार्‍या बँकांवर सक्‍त कारवाई करण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिल्या आहेत. 

जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कर्जमाफी  झाल्यानंतर शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झाला आहे.  विनाविलंब सुलभतेने शेतकर्‍याला कर्ज मिळावे, यासाठी शासन पुढाकार घेतला आहे.  काही बँका या मोहिमेला गती देत नसल्याचे दिसून आले आहे. अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल. ज्या बँकेमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या शेकडो खात्यांत मोठ्या प्रमाणात पैसा जमा आहे. त्या खात्यांना बंद करून ज्या बँका सहकार्य करणार त्या बँकेच्या खात्यामध्ये रक्‍कम जमा करण्यात येईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी सूचित केले आहे. 

जिल्हाधिकारी बँकेमध्ये जमा झालेला रकमा आणि यावर्षी शेतकर्‍यांना देण्याचे कर्ज याबाबतीत बँकांनी ताळमेळ लावावा आणि शेतकर्‍यांना कर्ज देण्यासाठी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण 50 हजार पात्र शेतकर्‍यांना 337 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा बँकेने 55 टक्के वाटा उचलला आहे. खरीप पीक कर्ज वाटपासाठी प्रत्येक बँकेमध्ये मेळावा घेण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये ज्यांना कर्जमाफ करण्यात आले आहे. अशा खातेधारकांना पुढील वर्षासाठी खरीप पीक कर्ज उपलब्ध केले जाणार आहे. सर्व बँकांमध्ये आयोजित होणार्‍या या मेळाव्यामध्ये शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.