Sun, Jul 21, 2019 10:20होमपेज › Konkan › फणसगावातील खेळाडूचा ऑस्ट्रेलियात अपघाती मृत्यू 

फणसगावातील खेळाडूचा ऑस्ट्रेलियात अपघाती मृत्यू 

Published On: Jun 07 2018 2:06AM | Last Updated: Jun 06 2018 10:57PMकासार्डे : (वार्ताहर )

देवगड  तालुक्यातील फणसगाव माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मालगोंडा जाधव यांचा इंजिनिअर असलेला सुपुत्र शिवानंद जाधव (37) हा अलीकडेच ऑस्ट्रेलियामध्ये नोकरीसाठी स्थायिक झाला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू म्हणून ओळख असलेल्या शिवानंद यांनी ऑस्ट्रेलियात पर्थ शहराजवळ महामार्गावर सायकलरेसमध्ये भाग घेतला असताना त्यांना ट्रकने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. अनेक स्पर्धांमध्ये विजय मिळविलेल्या या खेळाडूची मृत्यूशी झुंज मात्र अपयशी ठरली.

शिवानंद याच्या मृत्यूच्या बातमीमुळे तो ज्या गावात लहानाचा मोठा झाला, शिकला, सवरला त्या फणसगावात ग्रामस्थांना धक्‍काच बसला आहे. त्याशिवाय त्याचे मूळ गाव असलेल्या बेळगाव-निपाणीजवळील कोडणी गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  शिवानंद जाधव यांचे पार्थिव त्यांच्या मूळ कोडणी व्हाया निपाणी (ता. निपाणी जि. बेळगाव, कर्नाटक) येथे आणण्यासाठी त्यांचे नातेवाईक ऑस्ट्रेलियात 
पोहचले.विदेशातील सोपस्कार पूर्ण करून भारतीय दुतावासांच्या सहकार्याने तीन  ते चार दिवसात ( शनिवार, रविवारपर्यंत) त्यांचा पार्थिव देह मूळ गावी कोडणी येथे  पोहोच होईल, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

रनिंग  व सायकलिंग या क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदक विजेता खेळाडू शिवानंद मलगोंडा जाधव (37)  यांचा ऑस्ट्रेलियात सायकल रेस चालू असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. हा अपघात ऑस्ट्रेलियातील पर्थ शहराच्या एका महामार्गावर रविवारी 3 जून रोजी सकाळी  स्पर्धा सुरू असताना  घडला आहे .  शिवानंद मलगोंडा जाधव पेशाने इंजिनिअर होते. नोकरीच्या निमित्ताने गेल्या कांही वर्षापासून ऑस्ट्रेलियात पर्थ याठिकाणी टाटा कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. नोकरी व्यवसाय संभाळून त्यांना धावणे व सायकलिंग या क्रीडाप्रकाराची खूपच आवड असल्याने त्यांनी कंपनीच्यावतीने भारतात व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत भाग घेऊन यश संपादन केले होते. गेल्या रविवारी सकाळी पर्थ येथील अशाच एका सायकलिंग स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता. नियोजित अंतर त्यांनी पूर्णही करीत आणले होते. फक्त 100 मी आंतर पार करणे बाकी असताना मागून येणार्‍या ट्रकने  जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले.

त्यांना तत्काळ पर्थ जवळील बूनबेरी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना जीवदान देता आले नाही. सलग दोन दिवस त्यांची मृत्यूशी झूंज चालू होती. मंगळवारी भारतीय वेळेनुसार  सकाळी 8 वा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई , वडील, पत्नी व एक छोटा मूलगा असा परिवार आहे.  अतिशय मेहनती दातृत्व गुण असलेला खेळाडूच्या अपघाती निधनाने फणसगाव पंचक्रोशी व जिल्ह्यातून हळहळ व्यक्‍त होत आहे.