Mon, Aug 26, 2019 15:25होमपेज › Konkan › फेक कॉल करून गंडा घालणारा जयपूर येथून ताब्यात

फेक कॉल करून गंडा घालणारा जयपूर येथून ताब्यात

Published On: Feb 05 2019 1:56AM | Last Updated: Feb 04 2019 10:07PM
वेंगुर्ले : शहर वार्ताहर       

मी बँकेतून बोलत आहे, तुमचा  एटीएम नंबर द्या, असे  सांगत अज्ञाताने आजगाव येथील निखिता निवृत्ती जाधव यांच्या बँक खात्यातील 48 हजार 998 रुपयांवर डल्ला मारला होता. याप्रकरणी उत्तम छोटन दास (28) याला वेंगुर्ले पोलिसांनी राजस्थान-जयपूर येथून ताब्यात घेतले. त्याला सोमवारी कुडाळ न्यायालयात हजर केले असता त्याला 7 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी दिली. 

आजगाव येथील निखिता निवृत्ती जाधव यांना दूरध्वनीवरून संपर्क करून बँकेतून बोलतो असे खोटे सांगून एटीएम नंबर घेतला होता व त्यांच्या बँक खात्यातून 48 हजार 998 रुपये काढले होते. यासंबंधी निखिता जाधव यांनी वेंगुर्ले पोलिसांत सदर घटनेची माहिती दिली होती. त्यावरून वेंगुर्ले पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून उत्तम छोटन दास याला 31 जानेवारी 2019 रोजी जयपूर राजस्थान  येथून ताब्यात घेतले होते. जयपूर न्यायालयाने 5 दिवसांची प्रवासी पोलिस कोठडी दिली होती.  3 फेब्रुवारी रोजी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात अटक करून हजर करण्यात आले. 
4 फेब्रुवारी रोजी कुडाळ न्यायालयात हजर केले असता त्याला 7 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी देण्याचे आदेश दिले.