Wed, Jan 23, 2019 16:55होमपेज › Konkan › खेड नगराध्यक्षांसह 100 जणांवर गुन्हा

खेड नगराध्यक्षांसह 100 जणांवर गुन्हा

Published On: May 03 2018 11:22PM | Last Updated: May 03 2018 11:22PMखेड : प्रतिनिधी

कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दि. 2 मे रोजी खेड प्रांताधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह 100 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे वातावरण तापले असून आंदोलकांच्या मागणीनुसार दि. 4 रोजी होणार्‍या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. कशेडी ते परशुराम या भागात हे काम कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दिले आहे. मात्र, काम सुरू झाल्यापासून कंपनीच्या कामकाजाबाबत वादंग निर्माण झाले आहे. दि. 14 एप्रिल रोजी खवटी येथे दुचाकी व ट्रेलरच्या अपघातात विशाल मोरे या तरुणाचा व आयुष वाडकर या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर कंपनीविरोधात जनप्रक्षोभ उसळला आहे. पोलिसांनीदेखील कंपनीचे मालक व व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

काही दिवसांपूर्वी मनसेने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन मृत विशाल मोरे व आयुष वाडकर यांच्या कुटुंबीयांना भरघोस मदत देण्याची मागणी केली होती. कंपनीच्या बेजबाबदार कामाकडे लक्ष वेधण्यासाठी  बुधवारी (दि. 2) खेड येथे प्रांत कार्यालयासमोर मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मनसैनिक रस्त्यावर उतरले व त्यांनी सुमारे दीड तास खेड-दापोली मार्ग रोखून धरला होता.

याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यातील नाईक प्रशांत चव्हाण यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये नगराध्यक्ष वैभव खेडेकर, नगरसेवक भूषण चिखले, कल्याणी बेलोसे, राष्ट्रवादीचे पालिकेतील गटनेते अजय माने, माजी नगराध्यक्ष उर्मिला पाटणे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विश्‍वास मुधोळे, दादु नांदगावकर, रहिम सहिबोले, गणेश बेलोसे, वसंत पिंपळकर, नंदु साळवी, नाना चाळके, भैय्यु भोजने, चेतन धामणकर, अजित भांबड, समीर कौचाली आदींसह 100 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.