Fri, Jul 19, 2019 18:34होमपेज › Konkan › कोकणातील तरुणांची ‘शिपिंग’मध्ये फसवणूक

कोकणातील तरुणांची ‘शिपिंग’मध्ये फसवणूक

Published On: Mar 12 2018 10:54PM | Last Updated: Mar 12 2018 9:10PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणातील तरुणांची शिपिंग क्षेत्रात फसवणूक होत आहे. नोकरीच्या नावाने फसवणूक झालेल्या तरुणांना न्याय मिळवून देऊ, असे आश्‍वासन राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी दिले आहे.

शिपिंग क्षेत्र हे भारतातील एक मोठे व अग्रेसर क्षेत्र मानले जाते. शिपिंग क्षेत्रामध्ये अनेक नोकर्‍यांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते व इतर क्षेत्रांच्या तुलनेमध्ये या क्षेत्रामध्ये नोकरी करणार्‍या तरुणांना देण्यात येणार्‍या पगाराची रक्‍कमदेखील जास्त असते. तसेच या क्षेत्रामध्ये नोकरी करताना जगभर फिरण्याची संधी मिळत असल्याने शिपिंग क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्यासाठी अनेक तरूण मोठ्या अपेक्षेने प्रयत्न करत असतात. कोकणातील व विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो तरूण या शिपिंग क्षेत्रामध्ये सध्या कार्यरत आहेत. 

परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये शिपिंग क्षेत्रामध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली कोकणातील अनेक तरुणांची फसवणूक होत असल्याचे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत आहेत. कोकणातील अनेक तरुणांकडून शिपिंग क्षेत्रामध्ये नोकरी मिळवून देण्याचा नावाखाली लाखो रुपये उकळले जात असून या तरुणांना लुबाडण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. काही कोकणाबाहेरील मंडळी राजकीय आश्रय घेऊन कोकणातील तरुणांची ही फसवणूक करत आहेत. ही मंडळी कोकणातील गरजू तरुणांना राजकीय माध्यमातून हेरून व तरुणांची गरज लक्षात घेऊन त्यांना शिपिंग क्षेत्राचे आमिष दाखवतात तसेच जगभर फिरण्याची संधी असल्याचे भासवितात. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील तरुणांना नोकरीचे आमिष दाखवतात. हे दलाल तरुणांना नोकरी लावण्याचे सामाजिक कार्य करत असून वरिष्ठांना पैसे द्यावे लागतात, असे सांगून त्यांच्याकडून लाखो रूपये उकळतात. 

त्यांच्या आमिषाला बळी पडून आपल्या कुटुंबीयांनी आयुष्यभर साठवलेली रक्‍कम या दलालांकडे  देत असल्याचे दिसून येत आहे. ही मंडळी या तरुणांना काही पारदर्शक कारभार नसलेल्या खासगी कंपन्यांमार्फत शिपिंग क्षेत्रामध्ये तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी मिळवून देतात. सुमारे 9 महिन्यांनंतर अशा तरुणांना या कंपन्या ब्रेक देतात आणि नोकरीवरून कमी करून पुन्हा घरी पाठवतात. कायमस्वरूपी नोकरीच्या आमिषाने लाखो रूपये देऊन अशा प्रकारची फसवणूक कोकणातील तरुणांच्या पदरी येत असल्याचे दिसून येते.

हे दलाल नोकरी लावण्याच्या आमिषावरच थांबत नसून शिपिंग क्षेत्रामध्ये नोकरीसाठी काही कालावधीचे प्रशिक्षण घेणे गरजेचे असल्याचे तरुणांना सांगून हे दलाल या प्रशिक्षणाच्या फीमध्ये देखील आपली काही रक्‍कम वाढवून तरुणांची लुबाडणूक केल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. कायमस्वरूपी नोकरी दिल्यास या दलालांना नवीन संधी मिळणार नसल्याने हे दलाल कोकणातील तरुणांना 9 महिन्यांच्या तात्पुरत्या नोकरीची संधी उपलब्ध करून देत नंतर आपली नवीन शिकार शोधतात. काही तरुणांना तर लाखो रूपये देऊन सुद्धा तात्पुरत्या स्वरूपाची देखील नोकरी प्राप्त झाली नसल्याचे प्रकार घडले आहेत.

कोकणातील अनेक तरुणांची अशा प्रकारे फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येत असून अशा काही तक्रारी देखील आपणाकडे आल्या असल्याचे आमदार राजन साळवी यांनी बोलताना सांगितले.काही तरूण पुराव्यानिशी आपल्याकडे संपर्क साधत असून आता यापुढे कोकणातील तरुणांची शिपिंग क्षेत्रात होणारी फसवणूक सहन केली जाणार नाही, असा इशारा आ. राजन साळवी यांनी दिला आहे. 
आपण स्वतः अशा तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून या तरुणांना न्याय मिळवून देणार असल्याचे आश्‍वासन आमदार राजन साळवी यांनी बोलताना दिले आहे.