Wed, Apr 24, 2019 01:46होमपेज › Konkan › बंडखोर उमेदवाराची हकालपट्टी करा अन्यथा आमचा मार्ग मोकळा!

बंडखोर उमेदवाराची हकालपट्टी करा अन्यथा आमचा मार्ग मोकळा!

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 10:21PM
आचरा : वार्ताहर
आचरा ग्रामपंचायत निवडणूकीत स्वाभिमान पक्षाच्या पॅनलला शह देण्यासाठी आचरा ग्रा. पं. निवडणूकीत शिवसेना- भाजपने युती करत पॅनल उभे केले होते. परंतू प्रभाग 1 मधील शिवसेना बंडखोर उमेदवार भाजप पुरस्कृत उमेदवाराच्या समोर उभा ठाकला असून आचरा विभागातील शिवसेना पदाधिकारी त्याला मदत करत असल्याचा आरोप भाजपा पदाधिकार्‍यांनी केला आहे. यामुळे युतीत फूट पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या बंडखोर उमेदवारांची हकालपट्टी करा व शिवसेना पदाधिकार्‍यांना भाजप उमेदवाराच्या प्रचारास उतरवा, अन्यथा आमचा मार्ग मोेकळा असा निर्वाणीचा इशारा आ. वैभव नाईक यांना भाजपाच्या वतीने धोंडू चिंदरकर यांनी  दिला. 

भाजपाचे लिलाधर पाटकर, प्रभाग 1 मधील उमेदवार समीर बावकर, देवेंद्र हडकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. आचरा ग्रा. पं. निवडणूकीसाठी शिवसेना- भाजपचे  आचरा विकास पॅनेल तयार करण्यात आले आहेे. सरपंच उमेदवार शिवसेनेचा तर 13 सदस्य पदासाठी शिवसेना पुरस्कृत 10 सदस्य उमेदवार व भाजप पुरस्कृत 3 उमेदवार निवडणूक रिंगणातआहेत.  प्रभाग 1 मध्ये भाजपचे समीर बावकर उमेदवार रिंगणात असून शिवसेनेचे किशोर कांबळी यांनी बंडखोरी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना पदाधिकारी उतरल्याचा दावा भाजपा पदाधिकार्‍यांचा आहे. या वरुन आचरा येथील युतीत तणाव निर्माण झाला आहे. 

उमेदवारी निश्‍चित झाल्यानंतर शिवसेना - भाजप पक्षाच्या उमेदवारांचा एकत्रित प्रचारही चालू होता. परंतू प्रभाग क्र. 1 हिर्लेवाडी मध्ये बंडखोर किशोर कांबळी यांनी आपण शिवसेना पुरस्कृत उमेदवार असल्याचे पत्रक काढून प्रचार सुरू केला आहे. कांबळींच्या प्रचारात आचरा विभागातील शिवसेना पदाधिकारी सहभागी झाले आहेत. तसेच शिवसेनेच्या पं. स. सदस्य निधी मुणगेकर यांचे वडील प्रवीण मुणगेकर त्यांचा प्रचार करत असल्याचा आरोप धोंडी चिंदरकर यांनी केला आहे.   किशोर कांबळी यांचा शिवसेना पदाधिकारी यांनी चालवलेला  प्रचार तात्काळ थांबवून किशोर कांबळी यांची शिवसेनेतून हकालपट्टी जाहीर करावी व भाजपचे उमेदवार समीर बावकर यांच्या प्रचारास शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उतरावे अशी मागणी  धोंडू चिंदरकर यांनी केली आहे. आ. वैभव नाईक यांनीच शिवसेना-  भाजप युती जाहीर केली. त्यानंतर भाजपने आचरा गाव विकासासाठी सकारात्मक चर्चेचे पाऊल उचलत युती करण्याचा निर्णय घेतला. आम. नाईक यांनीही युतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी प्रचारही सुरू केला होता. पण निवडणूकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना आचरा विभागातील शिवसेना पदाधिकारी कळीचे राजकारण करत असून भाजपला शह देण्यासाठी बंडखोर उमेदवाराला सहाय्य करत आहेत. आ. नाईक यांनी या पदाधिकार्‍यांना समज देऊन भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पदाधिकार्‍यांना उतरावे अन्यथा निवडणूकीच्या प्रचारासाठी 4 दिवस शिल्लक असून भाजपला अजूनही सर्व पर्याय खुले आहेत याचा शिवसेनेने विचार करावा असा इशारा भाजपाच्या वतीने चिंदरकर यांनी दिला आहे.