होमपेज › Konkan › वायंगणी समुद्रात स्फोटसदृष्य आवाज

वायंगणी समुद्रात स्फोटसदृष्य आवाज

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 16 2018 11:08PMवेंगुर्ले : प्रतिनिधी

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारी गुरूवारी रात्री उशिरा स्फोटसदृष्य आवाज झाल्याची माहिती स्थानिक मच्छिमारांनी दिली आहे. गेल्यावर्षी असेच स्फोटसदृष्य आवाज या भागात झाले होते. तज्ज्ञांनी या भागाला भेट देवून भूगर्भातील हालचालींमुळे असे आवाज येत असल्याचे म्हटले होते. 

गेल्यावर्षी निवती भागामध्ये समुद्रामध्ये आवाज झाले होते. निवती हा समुद्रकिनारा वायंगणीपासून जवळच आहे. गुरूवारी रात्री उशिरा वायंगणी येथे स्थानिक ग्रामस्थांना असे आवाज ऐकू आले.     
मच्छिमारांच्या घरांना या आवाजामुळे हादरे बसल्याचेही सांगण्यात येते. वायंगणी समुद्रातील भूगर्भात हालचाली झाल्याचा प्राथमिक अंदाज मच्छिमार बांधवांनी व्यक्त केला आहे. पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी वायंगणी भागाला शुक्रवारी तातडीने भेट देवून पाहणी केली.

त्यामध्ये पाहणीनंतरचा अहवाल तसहीलदार  व पोलिस अधीक्षकांना पाठविण्याची माहिती कोळी यांनी दिली. पोलिसांनी व तज्ज्ञांनी याचा तपास करून हा आवाज कसला आहे याबाबतची माहिती लोकांना सांगावी अशी मागणी आता मच्छिमार करत आहेत. भारताची पश्‍चिम किनारपट्टी दहशतवादी कारवायांच्यादृष्टीने नेहमी संवेदनशील राहीली आहे. त्यामुळे असेच स्फोटसदृष्य आवाज आल्यानंतर मच्छिमारांमध्ये नेहमी भीतीचे वातावरण निर्माण होते. पोलिसांनाही सतर्क रहावे लागते. म्हणूनच सुरक्षा यंत्रणांनी याचा गांभिर्याने तपास करावा अशीही मच्छिमारांची मागणी आहे.