Thu, Aug 22, 2019 10:11होमपेज › Konkan › कणकवली न. पं. निवडणुकीत पैशांची उधळपट्टी!

कणकवली न. पं. निवडणुकीत पैशांची उधळपट्टी!

Published On: Jun 29 2018 12:06AM | Last Updated: Jun 28 2018 9:05PMकणकवली : प्रतिनिधी

कणकवली नगरपंचायतीच्या 2013 साली झालेल्या निवडणुकीवर 7 लाख 43 हजार 672 रु. खर्च झाला होता तर एप्रिल 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीवर 28 लाख 33 हजार 324 रू. खर्च झाला आहे. याचा अर्थ 5 वर्षांत  चौपट खर्च झाला आहे. हा खर्च कणकवली न. पं. च्या फंडातून करण्यात आला असून हा पैसा करापोटी आलेला जनतेचाच असतो. त्यामुळे ही कणकवलीतील जनतेच्या पैशांची उधळपट्टीच असून याला तत्कालीन मुख्याधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी जबाबदार आहेत. या वारेमाप खर्चाची सखोल चौकशी करण्याची मागणी  जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे करणार असल्याची माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

कणकवली न. पं. तील आपल्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, गटनेते संजय कामतेकर, नगसेवक किशोर राणे, अभि मुसळे, अ‍ॅड. विराज भोसले, अजय गांगण उपस्थित होते. समीर नलावडे म्हणाले, आम्ही नगरपंचायत प्रशासनाकडून यावर्षी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या खर्चाची माहिती घेतली. 2013 च्या निवडणुकीवेळी कणकवली न. पं. वर आमची सत्ता होती. त्यावेळी न. पं. निवडणूक प्रक्रियेसाठी नगरपंचायतीचा बहुउद्देशीय हॉलच वापरण्यात आला होता. त्या वेळी 7 लाख 43  हजार 672 रू. एवढा निवडणुकीवर खर्च झाला.

मात्र, एप्रिल 2018 च्या निवडणुकीवर झालेल्या खर्चाचे आकडे पाहता आम्ही चक्रावून गेलो. पाच वर्षांत या निवडणुकीवर चौपट खर्च करण्यात आला आहे. कणकवली नगरपंचायतीचा हॉल उपलब्ध असताना तहसील कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. झालेल्या खर्चामध्ये  मतदान साहित्यावर 7 लाख 84 हजार 846  रु. एवढा खर्च झाला आहे. विशेष म्हणजे एवढ्या खर्चातच 2013 सालची निवडणूक प्रक्रिया पार पडली होती.  मतदान साहित्यावरील या  खर्चामध्ये खुर्च्या, टेबल, मंडप, मतदान साहित्य छपाई, साहित्य ने-आण अशा बाबींचा समावेश आहे.

व्हिडोओग्राफीसाठी 4 लाख 34 हजार, स्टेशनरीसाठी 3 लाख 27 हजार, चहापानासाठी 3 लाख 64 हजार असा खर्च लावण्यात आला आहे. मात्र, हा दामदुप्पट खर्च पाहता यामध्ये शंका येण्यास वाव आहे. करापोटी आलेल्या जनतेच्या पैशांचा हा अपव्ययच आहे. खुर्च्या, टेबल, मंडप, चहापान, स्टेशनरीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च कसा काय होऊ शकतो?  असा सवाल नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला. 

विशेष म्हणजे आम्ही कार्यभार स्विकारण्याच्या आधीच या खर्चाची बिले अदा करण्यात आली आहेत. हा पदाधिकार्‍यांचा दोष नव्हे तर प्रशासनाचा दोष आहे. जनतेच्या पैशांची ही उधळपट्टी असून याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे चौकशीची मागणी करणार असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले. 

निवडणूक खर्चाची बाब मुख्याधिकार्‍यांच्याच अखत्यारित ः सौ. शिंदे

याबाबत न. पं. च्या  निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सौ. नीता सावंत-शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही केवळ निवडणूक प्रक्रिया पार पाडतो. निवडणुकीवरील विविध बाबींवरील खर्च हा मुख्याधिकारीच करत असतात. त्यामुळे या खर्चाशी आमचा काहीच संबंध नाही, असे सौ. शिंदे यांनी सांगितले.  दरम्यान, कणकवली न. पं. चे तत्कालिन मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्याला यावर काहीच बोलायचे नाही एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली.