Sun, May 19, 2019 14:21
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › विदेशी सिगारेट तस्करीचा पर्दाफाश

विदेशी सिगारेट तस्करीचा पर्दाफाश

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 05 2018 10:30PMबांदा ः वार्ताहर

विदेशी बनावटीच्या सिगारेटची मोठी तस्करी बांदा पोलिसांनी समोर आणली आहे. खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीवरून बांदा चेकपोस्टवर खासगी ट्रॅव्हल्समधून केल्या जाणार्‍या सिगारेट तस्करीविरोधात बांदा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत तब्बल सतराशे पॅकेटसह सुमारे 5 लाख 10 हजार रुपयांचा सिंगरेट साठा जप्त केला आहे. बेकायदा सिगारेट वाहतूकप्रकरणी महम्मद सन्फिर मोयडू मोहल (35, मूळ रा. केरळ, सध्या रा. गोवा) याला ताब्यात घेण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी दुपारी 1.30 वा. च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

गोव्यातून मुंबईकडे बेकायदा विदेशी बनावटीची सिगारेट वाहतूक होणार असल्याची पक्‍की टीप बांदा पोलिसांना खबर्‍यांकडून प्राप्त झाली होती. त्यानुसार बुधवार सकाळपासूनच बांदा चेकपोस्टवर पोलिसांनी सापळा रचला होता. गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणारी एक खासगी बस तपासणीसाठी थांबविण्यात आली. तपासणी दरम्यान चालकाच्या केबिनमध्ये क्लिनरच्या बाजूला दोन बॅगा व एक बॉक्स निदर्शनास आला. दोन्ही बॅगांना कुलूप केलेले होते. चालकाकडे चौकशी केली असता सदर बॅगांबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांना संशय आला.

एपीआय कळेकर यांनी तत्काळ चौकशीची चक्रे फिरविली. जोपर्यंत संबंधित बॅगा बसमध्ये टाकणारा इसम पोलिस स्थानकात हजर होत नाही, तोपर्यंत प्रवासी बस सोडणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. बुधवारी सायंकाळी उशिरा संशयित आरोपी मोहम्मद सन्फिर मोयडू मोहल हा बांदा पोलिसांत हजर झाला. त्यानंतर प्रवासी बस मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. दरम्यान या कारवाईमुळे प्रवाशांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

दोन्ही बॅगांमध्ये बेन्सन अ‍ॅण्ड हेजेस ब्ल्यू गोल्ड एस्टॅब्लिश्ड लंडन या ब्रँडच्या सिगरेटची तब्बल 1700 पॅकेट्स होती. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत 5 लाख 10 हजार रुपये इतकी आहे. ही कारवाई एपीआय जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत मिशाळ, कॉन्स्टेबल संजय कोरगावकर, मनिष शिंदे, हेमंत पेडणेकर यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे बेकायदा व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.