Wed, Jun 26, 2019 11:26होमपेज › Konkan › दोन दिवसांत अतिवृष्टी

दोन दिवसांत अतिवृष्टी

Published On: Jul 04 2018 2:14AM | Last Updated: Jul 03 2018 10:21PMरत्नागिरी : प्रतिनिधी

गेले अनेक दिवस ओढ घेतलेल्या पावसाने मंगळवारी जोरदार मुसंडी मारत गतवर्षीच्या जुलैच्या सुरुवातीला झालेल्या एकूण पावसाच्या तुलनेत साडेतीन हजार मि.मी.ची आघाडी घेतली आहे, तर सरासरीच्या तुलनेत गतवर्षाच्या पावसाला यावर्षी चारशे मि.मी. ने मागे टाकले आहे. दरम्यान, आगामी दोन दिवस कोकण किनारपट्टी भागात विशेष करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता  भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविली आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

सोमवारी रात्री सक्रिय झालेला पाऊस मंगळवारीही कायम होता. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या अहवालानुसार मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत जिल्ह्यात अनेक भागात झालेल्या पडझडीमुळे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले. यामध्ये चिपळूण तालुक्यात वालोपे आणि शिरंबे येथे घरात पाणी शिरल्याने सुमारे सव्वा लाखाची हानी झाली आहे. गुहागर तालुक्यात तवसाळ येथे घरावर झाड पडल्याने सुमारे 60 हजारांची हानी झाली. गेले दोन दिवस झालेल्या पावसाने मिरजोळे येथे जमीन खचण्याच्या प्रकारात भात शेेतीचे आणि बांधाचे सुमारे पाऊण लाखांचे नुकसान झाले आहे. संगमेश्‍वर तालुक्यात घराच्या पडझडीत सुमारे 26 हजारांची हानी झाली आहे. रत्नागिरी तालुक्यात वरवडे येथे घरावर झाड पडल्याने सुमारे 15 लाखांची हानी नोंदविण्यात आली आहे. 

‘आयएमडी’ने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्षाची सज्जता करताना लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. जोरदार पावसात सुरक्षिततेसाठी शक्यतो ग्रामस्थ आणि नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, तसेच या कालावधीत कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन  मुंबईत झालेल्या रेल्वे पूल दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर निवासी जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी केले आहे.