Fri, Jul 19, 2019 07:17होमपेज › Konkan › दुष्काळग्रस्त गावातील गुरुजींची सुट्टीतही शाळा

दुष्काळग्रस्त गावातील गुरुजींची सुट्टीतही शाळा

Published On: May 06 2018 1:09AM | Last Updated: May 06 2018 12:26AMकुडाळ : वार्ताहर

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त 14 हजार 679 गावातील शिक्षकांना उन्हाळी सुट्टी असली तरी शाळेत हजर राहण्याचे आदेश शासनाने निर्गमित  केले आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सल्‍लागार चंद्रकांत अणावकर यांनी दिली आहे. 

महाराष्ट्रातील ज्या 14 हजार 679  गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे ती गावे शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून  जाहीर केली  आहेत. या गावांच्या विकासासाठी  शासनाने विशेष योजना सुरू केल्या आहेत. या दुष्काळग्रस्त गावातील शालेय विद्यार्थ्यांचे कुपोषण होवू नये यासाठी  शाळांना  उन्हाळी सुट्टी असली तरी एप्रिल, मे, जून या तीन महिन्यात तेथील शाळा सकाळच्या सत्रात  सुरू ठेवून विद्यार्थ्यांना  शालेय पोषण आहार शिजवून वितरीत  करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

एप्रिल ते जून या तीन महिन्यात प्रत्येकी 26 कार्यदिन धरून  विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून वितरीत करण्यासाठी मुख्याध्यापकांनी रोज शाळेतील शिक्षकांची त्यांच्या सोयीप्रमाणे आलटून पालटून पाळी लावून शाळा सुरू ठेवून शाळा स्वच्छ  ठेवणे, पोषण आहाराच्या धान्यादी माल करून घेणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था  विद्यार्थ्यांचे दररोज उपस्थित  पत्रक भरणे, पोषण आहार वितरीत करण्यापूर्वी त्या दिवशी ड्युटीवर  असणार्‍या शिक्षकाने  करावीत असे शासनाने आदेश दिले आहेत.

शालेय पोषण आहाराची सर्व रजिस्टर्स  ड्युटीवर असणार्‍या शिक्षकांच्या ताब्यात देवून  त्यातील नोंदी दररोज संबंधित शिक्षकांनी  करायच्या आहेत. सर्व पर्यवेक्षीय अधिकार्‍यांनी एप्रिल ते जून या तीन महिन्यात शाळांचा  आहार योजनेचा आढावा  घ्यावा असेही सुचित केले आहे. त्यामुळे यावर्षी गावातील  शिक्षकांना  उन्हाळी सुट्टी असली तरी  शाळेत उपस्थित राहणे  क्रमप्राप्त आहे.