Tue, Mar 19, 2019 03:12होमपेज › Konkan › दडपशाही केली तरी रिफायनरी हटविणारच

दडपशाही केली तरी रिफायनरी हटविणारच

Published On: May 03 2018 1:29AM | Last Updated: May 02 2018 11:04PMराजापूर : प्रतिनिधी

काँग्रेसने विकासाच्या विरोधात कधीच कुटिल राजकारण केले नाही. पण, भाजप सरकारने विनाशकारी प्रकल्प निसर्गरम्य कोकणच्या माथी मारताना जी दंडेली चालविली आहे, तेवढी इंग्रजांच्या काळातदेखील झाली नव्हती. अशा शासनाकडून कितीही दडपशाही झाली, तरी त्याची पर्वा न करता रिफायनरी प्रकल्प हटविणारच. येथील जनतेच्या घरांवर नांगर फिरवून विकास करणार असाल, तर शासनालाच उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सागवे येथे रिफायनरीविरोधी हल्लाबोल सभेत केला.

नाणार प्रकल्पग्रस्तांच्या  समस्या जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी  बुधवारी नाणारचा दौरा केला. यावेळी सागवेच्या कोचाळी मैदानावर त्यांची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, खा.  हुसेन दलवाई, आ. भाई सावंत, हुस्नबानू खलिफे, प्रवक्‍ते हरिष रोग्ये, सचिन सावंत, माणिकराव जगताप, विश्‍वनाथ पाटील, रमेश कदम, प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.खा. चव्हाण म्हणाले, कोकण हा संपन्‍न प्रदेश आहे. गेल्या अनेक वर्षांत फलोत्पादन व पर्यटनाच्या माध्यमातून हा प्रांत संपन्‍न झाला आहे. अशा ठिकाणी पूरक स्वरूपाचे प्रकल्प अपेक्षित असतानाच या शासनाने विनाशकारी प्रकल्प आणून राखरांगोळी करण्याचा डाव आखला आहे. विकासाला आमचा अजिबात विरोध नाही; पण येथील जनतेला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलात, तर ते अजिबात सहन करणार नाही, अशा शब्दांत त्यांनी ठणकावले. 

रिफायनरी प्रकल्पाच्या अधिसूचना रद्द करण्याच्या निर्णयावरून शिवसेना-भाजपमधील संघर्षावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी तोफ डागली. आपणही या राज्याचे मुख्यमंत्री होतो. शिवाय उद्योगमंत्री म्हणूनही काम पाहिले असल्याने सर्व कायदे चांगलेच माहिती आहेत.  रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी उद्योग खात्याने काढलेली अधिसूचना रद्द करण्याचे अधिकार  हे  जसे  मुख्यमंत्र्यांना आहेत तसेच  ते  उद्योगमंत्र्यांनादेखील आहेत. मात्र, ते अधिकार सचिव पातळीवर नाहीत, याची त्यांनी आठवण करुन दिली. पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांकडून ती अधिसूचना रद्द झाल्यावर तसे त्या मंत्र्यांना अधिकार नसल्याचे केलेले विधान लक्षात घेता हे राज्य मुख्यमंत्र्यांचे आहे का सचिवांचे?  असा सवाल त्यांनी केला. सेना-भाजपतील सुरु असलेला संघर्ष म्हणजे ‘वरुन तमाशा व आतून कीर्तन’ असल्याची त्यांनी खिल्ली उडवली. जर मंत्रिमंडळात किंमत नसेल तर शिवसेनेने स्वाभिमान दाखवून बाहेर पडावे, असा सल्लाही त्यांनी दिला. 

ते पुढे म्हणाले, रिफायनरी प्रकल्पात मुंबईतील एक बिल्डर जमिनींची दलाली करीत असून सत्ताधारीसुद्धा दलाल बनल्याचा  त्यांनी  जोरदार आरोप केला. कोकणातील गोरगरीब जनतेच्या जमिनी हडप करण्याचे उद्योग सुरु असून गरिबांच्या घरावर नांगर फिरवण्याचे काम हे सरकार करीत आहे. मात्र, जनतेच्या प्रश्‍नावर सदैव लढणारी काँग्रेस ते प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहाणार नाही, असा इशाराही  दिला. काँग्रेसच्या मंडळींनी आता मुंबईत अधिक न राहता कोकणात या असा सल्ला त्यांनी आपल्या सहकार्‍यांना दिला.

काँग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश यांनीही मोदी, फडणवीस व भाजपवर हल्ला चढवला. सुरु असलेला लढा आणखी वर्षभर सुरु ठेवा. कारण 2019 नंतर जनता केंद्रातील सरकारला घरी पाठवेल व आपण तुमच्यावर आलेले हे संकट परतवून लावल्याशिवाय राहाणार नाही, अशी त्यांनी ग्वाही दिली. देशातील एका समुदायाला पाकिस्तानला पाठविण्याच्या धमक्या दिल्या जातात. पण ज्या सौदीच्या कंपनीशी करार करण्यात आला आहे त्या कंपनीकडे मोठ्या प्रमाणावर पाकमधील इंजिनिअर आहेत ते तुम्हाला चालतील का? असा सवाल मोहन प्रकाश यांनी उपस्थित केला. 

‘जैतापूर’बाबत टाळाटाळ

शासनाने कोकणला उद्ध्वस्त करण्यासाठी कोणकोणते प्रकल्प कोकणात आणले, त्याचा पाढा काँग्रेसच्या वक्त्यांनी वाचला. पण, राजापूर तालुक्यात काँग्रेस राजवटीत आलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर बोलण्याचे कटाक्षाने टाळले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांकडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसाठी यावेळी निवेदन देण्यात आली. या सभेला शेतकरी व मच्छीमार कृती समितीने बहिष्कार टाकला. दरम्यान, पत्रकार परिषदेचे आयोजन करून त्या ठिकाणी जैतापूर प्रकल्पग्रस्त आल्याने प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि त्यांचे सहकारी पत्रकार परिषदेला उपस्थितच राहिले नाहीत.

Tags : Konkan, Even,  repressed,  refinery, removed