Sun, Aug 18, 2019 21:37होमपेज › Konkan › अपंगत्वावर मात करुन ‘त्याने’ फुलविला शेतमळा!

अपंगत्वावर मात करुन ‘त्याने’ फुलविला शेतमळा!

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 9:11PM

बुकमार्क करा

गिमवी : वार्ताहर

धावपळीच्या युगात थोड्याशा अपयशाने खचून जाणारे खूपजण आहेत. मात्र, चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील विश्‍वासराव शिंदे याला अपवाद आहेत. एका अपघातात दोन्ही हात गमावल्यानंतरही त्यांनी जिद्दीने शेतमळा फुलवला आहे. त्यांच्या या जिद्दीचा आदर्श अनेकांनी समोर ठेवला तर कोणतीही गोष्ट कठीण नाही असेच म्हणता येईल. जिद्द असणार्‍या माणसाला कोणीही अडवू शकत नाही हेच शिंदे यांनी आपल्या मेहनतीमधून दाखवून दिले आहे.

सेंट्रींगचे काम करणारे शिंदे यांना काम करताना अपघात झाला. या अपघातात त्यांना दोन्ही हात गमवावे लागले. त्यानंतर जगण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू झाला. पूर्वीपासूनच शेतीची आवड असलेल्या विश्‍वासराव शिंदे यांनी मग मनाशी चंग बांधला आणि अपंगत्वाची तमा न बाळगता त्यांनी कलिंगड लागवड करण्याचे ठरविले. राज्यभरात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा मुद्दा ऐरणीवर आहे. रोज कुठल्या ना कुठल्या तरी गावात एक शेतकरी आत्महत्या करीत आहे. परिस्थितीला कंटाळून तो हा निर्णय घेतो. मात्र, पिंपळी येथील शिंदे यांनी अपंगत्व असतानाही केलेली किमया राज्यभरातील शेतकर्‍यांसमोर अनोखा आदर्श अशीच आहे. 

विश्‍वासरावांनी जिद्द व मेहनतीच्या जोरावर सुमारे दोन एकर क्षेत्रावर कलिंगड पीक घेतले आहे. तसेच वांगी, दोडका, कारले, पालेभाजी आदी पिकेही त्यांनी घेतली आहे. शेत खणण्यापासून ते पॉवर टिलर चालवणे, रोपांची देखभाल आदी श्रमाची कामे ते स्वत: जिद्दीने करतात. हा त्यांचा जिद्दमय प्रवास पाहून अनेक शेतकर्‍यांनी प्रेरणा घेतली आहे. अपघातानंतर दोन्ही हात गमावूनही शिंदे यांनी स्वबळावर हे सर्व विश्‍व उभे केले आहे. शेतकर्‍यांनी खचून न जाता आलेल्या परिस्थितीशी झगडत शेतमळा फुलवून आर्थिक उन्‍नती साधावी, असे ते सांगतात. कोकणातील शेतकर्‍यांनी शिंदे यांच्यापासून प्रेरणा घेऊन जिद्दीने काम करावे, असेच त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अनेकांना वाटते.