Sat, Jul 20, 2019 10:39होमपेज › Konkan › खारफुटीच्या जंगलांवर करडी नजर

खारफुटीच्या जंगलांवर करडी नजर

Published On: Dec 18 2017 2:36AM | Last Updated: Dec 17 2017 8:10PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकण किनारपट्टी भागात खारफुटी संरक्षणासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने खारफुटी वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून खारफुटीची जागा हडप करण्याच्या प्रकाराविरोधात तक्रारींसह समस्या निवारणासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. ुुु.ुशींश्ररपव.लेा या  संकेतस्थळावर या क्षेत्रातील थेट तक्रार करता येणार आहे.

कोकणात सागरी किनारी विखुरलेल्या स्थितीत असलेल्या खारफुटीच्या संरक्षणासाठी शासनाने कोकणासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. या समितीचा कार्यभार मुंबईसह पाच जिल्ह्यात राहणार आहे. समितीने मुंबईसाठी स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करून दिले असून कोकणातील खारफुटी संरक्षणासाठी स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध केले आहे. या संकेतस्थळावर थेट तक्रार करून खारफुटीची अनिर्बंध तोड करणार्‍यांवर अथवा ही जंगले नष्ट करणार्‍यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. या क्षेत्रातील समस्यांचे निवारणही या संकेतस्थळावरून थेट करण्यात येणार आहे.

स्थापन केलेल्या समितीमार्फत   जिल्ह्यांच्या स्वतंत्र समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्या आता  या जंगलांची स्वच्छताही करणार आहेत.  प्रामुख्याने सागर किनारी असलेल्या खारफुटी वनस्पती मत्स्य संवर्धनासाठी उपयुक्त ठरतात. परंतु सागरी कचरा विषेशतः प्लास्टिक आणि कापडी कचरा या जंगलात अडकून येथील जैवविविधतेला बाधा आणत आहे. त्यामुळे आता ही समिती खारफुटीच्या जंगलातील  स्वच्छता करण्यावर भर देणार आहे. 

कोकण किनारपट्टी भागात खारफुटीची जंगले विखुरलेली आहेत. या जंगलांवर जमीन माफियांचा डोळा आहे. किनारी भागात जागेच्या हव्यासापायी माफियांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे खारफुटीची जंगले नष्ट होत असून येथील जैवविविधताही धोक्यात आली आहे.  आता या संकेतस्थळामुळे तक्रारी नोंदवता येणार आहेत.

खारफुटी जंगले वाचविण्यासाठी सहकार्याचे आवाहन

कोकणात स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असून याद्वारे गैरप्रकारांवर करडी नजर राहणार आहे. त्यासाठी  स्थापित केलेल्या संकेतस्थळावर थेट तक्रार करून ही जंगले वाचवण्याचा प्रयत्न आता समितीने सुरू केला असून यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे.