Thu, Jun 27, 2019 01:35होमपेज › Konkan › डिजिटायझेशनच्या अतिरेकात अन्नदिनाचा फज्जा

डिजिटायझेशनच्या अतिरेकात अन्नदिनाचा फज्जा

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 09 2017 8:50PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

रेशन दुकानांच्या डिजिटायझेशनच्या  अतिरेकाने महिन्याच्या प्रत्येक 7 तारखेला रेशन दुकानात  साजरा करण्यात येणारा अन्न दिनाचा फज्जा उडाला आहे. अनेक दुकानात ‘पॉस’ (पॉईंट ऑफ सेल) मशिन बंद  असल्याने पहिला अन्नदिनाचे नियोजन फसले आहे.  

जिल्ह्यातील रास्त धान्य दुकानदारांना पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या ई-पॉस मशीनमध्ये बर्‍याच त्रुटी असल्याचे निष्पन्न झाल्याने या मशिन पुरवठा विभागाकडे जमा करण्याच्या सूचना पुरवठा विभागाने सर्व रास्त धान्य दुकानदारांना दिल्या. त्यानुसार दुकानदारांनी या मशिन जमाही केल्या; मात्र, अनेक दिवसांचा कालावधी उलटूनही या मशिन अद्ययावत करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना धान्यापासून वंचित राहावे लागले आहे.  त्यामुळे  प्रत्येक महिन्याचा सात तारखेला अन्नदिन साजरा करण्याचे निर्देश असताना या पहिल्याच अन्न दिनाचा  फज्जा उडाला आहे. 

रास्त धान्य दुकानदारांना पुरवठा विभागाच्या वतीने धान्य वितरणासाठी ई-पॉस मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या; मात्र, या मशिनमध्ये चुकीची नावे, बारा डिजिटल क्रमांक नसणे, धान्याचे प्रमाण चुकीचे तसेच अनेक त्रुटी असल्याचे दिसून आले होते. ई-पॉस मशिनमध्ये बर्‍याच त्रुटी असल्याने अनेक लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी ई-पॉस मशिन अद्ययावत करण्याचे आदेश पुरवठा विभागास दिले.

त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील तहसीलदारांना याबाबत पत्र पाठवून त्या-त्या तालुक्यातील रास्त धान्य दुकानदारांना ई-पॉस मशिन पुरवठा विभागाकडे जमा करण्याच्या सूचना देण्याचे कळविण्यात आले. यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यक असल्याने सर्व ई-पॉस मशिन रास्त धान्य दुकानदारांना तालुका कार्यालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले. 

या मशिन तीन ते चार दिवसांत अद्ययावत केल्या जातील, असे पुरवठा विबागाने स्पष्ट केले होते; मात्र, अद्यापपर्यंत या मशिन अद्ययावत करण्याची कार्यवाही झालेली नाही. जिल्ह्यातील रास्त धान्य दुकानदारांकडे अद्ययावत मशिन न दिल्याने लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागले आहे. शिवाय शासनाच्या 
निर्देशानुसार प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला अन्नदिन साजरा करायचा आहे. मात्र ई-पॉस मशिन अद्ययावत न झाल्याने अन्नदिनच साजरा न झाल्याने पहिला अन्न दिन फसला आहे. अद्यापही पॉस मशिनमधील त्रुटी दूर न झाल्याने जिल्ह्यातील अनेक रेशन दुकाने बंद स्थितीत आहेत.