Sat, Dec 14, 2019 03:20होमपेज › Konkan › कुडाळमध्ये विरोध झुगारून अतिक्रमण हटविले!

कुडाळमध्ये विरोध झुगारून अतिक्रमण हटविले!

Published On: Jul 03 2019 1:54AM | Last Updated: Jul 02 2019 11:49PM
कुडाळ : प्रतिनिधी

कुडाळ  एस.एन.देसाई चौकातील वादग्रस्त गटर कुडाळ एमआयडीसी, कुडाळ पोलिस, कुडाळ नगरपंचायत, स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या संयुक्‍त पुढाकाराने प्रशासनाने मंगळवारी तब्बल चार तास धडक कारवाई करत खुला केला. या कारवाईला गाळेमालक प्रतिभा प्रल्हाद गोळवणकर व अमोल प्रल्हाद गोळवणकर या आई व मुलाने तीव्र विरोध केला. मुलगा अमोल गोळवणकर याने तर अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेण्याची धमकी दिली तर आई प्रतिभा गोळवणकर हिने जेसीबीच्या समोर येऊन ठाण मांडत गटार खोदाईला विरोध दर्शविला.अखेर पोलिसांनी आई व मुलाला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात हलविले. त्यानंतर जवळपास चार तास गटार खोदाई करत हे गटर मोकळे केले. दरम्यान शासकीय कामात अडथळा, आत्महत्येचा प्रयत्न, संगनमताने शिवीगाळ व मारण्याची धमकी  दिल्याची फिर्याद एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक हरीश्‍चंद्र वेेंगुर्लेकर यांनी कुडाळ पोलिस स्थानकात दिली. याप्रकरणी प्रतिभा गोळवणकर व अमोल गोळवणकर यांना पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  

कुडाळ एस.एन. देसाई (कॉलेज चौक) चौकातील एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या रस्त्यालगत अनधिकृत बांधकाम केल्यामुळे कॉलेज चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचून शाळा, कॉलेजच्या मुलांसह वाहनचालक व प्रवाशांना मोठा त्रास होत होता. या त्रासापासून सर्वाची सुटका व्हावी, याकरिता चार दिवसांपूर्वी कुडाळ एमआयडीसी, न.पं.व पोलिसांनी एकत्र येत पाण्याचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गाळे मालक गोळवणकर कुटुंबीयांनी टोकाचा विरोध केल्याने प्रशासन शांत राहिले होते. 

मात्र दुसर्‍याच दिवशी पावसाचा जोर वाढल्याने प्रशासकीय यंत्रणा जागी झाली. दुसरीकडे कुडाळवासीयांचा संताप वाढत असल्याचे लक्षात येताच संयुक्‍त कारवाई करत वादग्रस्त गटर मंगळवारी खुला करण्याची मोहीम प्रशासनाने आखली.

गटर खोदाईसाठी प्रशासकीय यंत्रणा ‘स्पॉट’वर 
वादग्रस्त गटर खुलं करण्यासाठी कुडाळ एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक हरीशचंद्र वेंगुर्लेकर, उपअभियंता अविनाश रेवंडकर, पोलिस निरीक्षक शंकर कोरे, उपनिरीक्षक गायत्री पाटील, शितल पाटील, पोलिस हे.काँ. भगवान चव्हाण, मंगेश जाधव, श्री. सरमळकर, श्री. डिसोजा, नगराध्यक्ष ओंकार तेली, उपनगराध्यक्ष सायली मांजरेकर, सीईओ देवानंद ढेकळे,नगरसेवक संध्या तेरसे, सुनील बांदेकर, साक्षी सावंत, अश्‍विनी गावडे, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व्ही.एम.पाटील, तलाठी लोबो आदींची टीम मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास कुडाळ कॉलेज येथील एस.एन.देसाई (सर्कल) चौकात जेसीबी मशीन,अग्‍निशामक बंब व पोलिस फौज फाट्यासह  हजर झाली. कुडाळ कॉलेज सर्कल ते तहसीलकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजुने वाहने लावून बंद केला. नगरपंचायत सीईओ श्री. ढेकळे यांनी आपल्या कर्मचार्‍यांना समोरून विरोध होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावधानपणे काम करा अशा सूचना केल्या. त्यानंतर एमआयडीसीच्या जागेत अतिक्रमण केलेला गटर खुला करण्यासाठी उपस्थित प्रशासकीय यंत्रणा पोलिस फाट्यासह पुढे सरकली.  

  आई-मुलाचा तीव्र विरोध
गटर खोदाई सुरू करताच आई प्रतिभा व मुलगा अमोल यांनी आमच्या हद्दीत खोदाई करू नका,असे सांगून अर्वाच्य भाषेत पोलिस निरीक्षक शंकर कोरे, एमआयडीसी अधिकारी श्री. वेंगुर्लेकर व श्री. रेवंडकर यांच्याशी बोलू लागले. या कारवाईचे अमोल गोळवणकर याने आपल्या मोबाईलमधून शुटींग सुरू केले.  याच दरम्यान मनसे जिल्हाप्रमुख धीरज परब, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे आनंद शिरवलकर यांच्यासह उपस्थित प्रमुख राजकीय मंडळींनी विरोध करणार्‍यांवर कारवाई करा आणि गटर खुले करा अशी मागणी केली. यावेळी गटर खोदाईला विरोध करणार्‍या प्रतिभा गोळवणकर हिला महिला पोलिसांनी ताब्यात घेत गाडीत घातले. दुसरीकडे कारवाईचे शुटींग करणार्‍या अमोल गोळवणकर याने दुकानात जावून पेट्रोलची बॉटल आणत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करेन, कारवाई थांबवा अशी धमकी अधिकार्‍यांना दिली. मात्र धमकीला न जुमानता अधिकार्‍यांनी  कारवाई सुरूच ठेवत  अमोल गोळवणकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

...अन् गटर खोदाई केली सुरू
पोलिसांनी आई व मुलाला ताब्यात घेतल्यानंतर गटर खोदाई सुरू करण्यात आली. याच दरम्यान आलेल्या मंदार गोळवणकर याने दुकान बंद करत प्रशासकीय यंत्रणेला विरोध करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांशी त्याने हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेण्याच्या हालचाली केल्या, मात्र त्याने पोलिसांनी ताब्यात न घेण्याची विनंती केली. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात न घेता कारवाई पूर्ण होईपर्यंत एक पोलिस सोबत ठेवला. 

पाईप टाकण्यास विरोध
गटर खोदाई नंतर गाळे मालक गोळवणकर कुटुंबियांना ये-जा करण्याकरिता दोन पाईप टाकून देण्याचा एमआयडीसीचा विचार होता. दोन पाईप गाडीने आणून गटर खोदाईच्या ठिकाणी उतरले होते. पण गोळवणकर यांच्या या अतिक्रमणामुळे शाळकरी मुलांसह, वाहनचालक व प्रवाशांना मोठा त्रास झाला. त्यातच अनधिकृत बांधकाम असल्यामुळे नगरपंचायतने त्यांना नोटीस दिली असल्याचे एमआयडीसीने पाईप टाकून देवू नयेत अशी विनंती अ‍ॅड. राजीव बिले, गजानन  कांदळगावकर, धीरज परब, आनंद शिरवलकर यांनी केली. यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेलीसह नगरसेवक उपस्थित होते. अखेर आणलेले पाईप माघारी पाठविण्यात आले. 

सुलभा हॉटेल समोरील पाईप उघडला अन्...
गटर खोदाईचे काम सुरू असतानाच सुलभा हॉटेलच्या समोरील बांधकामापर्यंत गटर खोदाई करण्यात आली. यावेळी त्याठिकाणच्या गटरातील  बंद करण्यात आलेल्या पाईपचे तोंड खुले झाल्याने अचानक वरच्या बाजुला साचलेले गटरातील पाणी तीव्रतेने खाली आले. परिणामी श्री.गोळवणकर यांच्या गाळ्यासमोरील खुदाई केलेल्या गटारात लगतची माती कोसळू लागल्याने दुकानासमोर पाईप टाकून द्यावा या मागणीकरीता मंदार गोळवणकर याने दुकानात बसून वस्तुंची आदळआपट सुरू केली. गटरातील पाण्यामुळे दुकानासमोरील भराव खचत असल्याने अखेर पोलिसांच्या पुढाकाराने कॉलेज चौकात असलेला जुना पाईप आणून त्यावर माती टाकून देत गाळे मालक गोळवणकर यांना ये-जा करण्यासाठी सोय केली.  या कारवाई दरम्यान कुडाळ तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी घटनास्थळी धावती भेट देवून ते मार्गस्थ झाले. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भास्कर परब, सदा अणावकर, विजय प्रभू आदींसह कुडाळ शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

इतर अतिक्रमणांवर अशीच कारवाई व्हावी
कुडाळ एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या कॉलेज चौकातील तहसीलकडे जाणार्‍या या रस्यावर अतिक्रमण करून बांधकामे करण्यात आली. अशाच  प्रकारची अनेक अतिक्रमणे कुडाळ एमआयडीसी व नगरपंचायतच्या रस्त्यावर आहेत. ती खुली करण्यासाठी अशाप्रकारची एकी प्रशासन व लोकप्रतिनिधीनी दाखवावी अशी मागणी कुडाळवासीयांमधून होत आहे.