होमपेज › Konkan › सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा सक्षम करा

सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा सक्षम करा

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 10:21PM

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

आ.वैभव नाईक यांनी गुरूवारी विधानसभेत सिंधुदुर्गच्या आरोग्य यंत्रणेेबाबतच्या अनेक प्रश्‍नांना वाचा फोडली. जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, मालवण या रूग्णालयांमध्ये तात्काळ वैद्यकीय अधीक्षक नियुक्‍त करा, वैद्यकीय अधिकार्‍यांची रिक्‍त पदे तत्काळ भरा, ग्रामीण रूग्णालयांमध्ये पुरेशी औषधे उपलब्ध करा, सिध्दीविनायक न्यासाकडून मिळालेल्या 1 कोटी निधीतून जिल्ह्यात तात्काळ डायलेसीस मशीन उपलब्ध करा, अशा अनेक मागण्या आ. नाईक यांनी केल्या. यावेळी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सिंधुदुर्गातील आरोग्य यंंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्याची ग्वाही दिली. 

आ. वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्गातील  वैद्यकीय अधिकार्‍यांच्या 130 पदांपैकी केवळ 30 पदे रिक्‍त असल्याचे उत्तर देण्यात आले आहे. परंतु वस्तूतः जिल्ह्यात  वैद्यकीय अधिकार्‍यांची 80 पदे रिक्‍त आहेत. कुडाळ, मालवण ग्रामीण रुग्णालय आणि कणकवली उपजिल्हा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिक्षक नाहीत. काही डॉक्टर  सात-आठ  महिन्यांपासून रजेवर आहेत. रजेवर असलेले डॉक्टर हजर असल्याचे शासनाकडून दाखवले जात आहे.

अशा डॉक्टरांना शासन बडतर्फ करणार की पर्याय उपलब्ध करणार, असा सवाल आ. नाईक यांनी केला. ग्रामीण रुग्णालयांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून औषध खरेदी झालेली नाही. सिध्दिविनायक न्यासामार्फत सिंधुदुर्गात डायलेसीस मशीन उपलब्ध करण्यासाठी 1 कोटी रू. दिले आहेत. परंतु आरोग्य खात्याने ते  खर्च केलेले नाहीत,याकडेही आ. नाईक यांनी लक्ष वेधले. यावेळी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शासन गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करेल. रजेच्या नावाखाली गेलेले परंतु पुन्हा कामावर हजर न झालेल्या डॉक्टरांनी काढून टाकण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाची मान्यता लागते. मात्र निश्‍चितपणे याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल,असे सांगितले.