Sun, Jul 21, 2019 14:49
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › मधमाशी पालन व्यवसायातून अन्नधान्य व रोजगार निर्मिती!

मधमाशी पालन व्यवसायातून अन्नधान्य व रोजगार निर्मिती!

Published On: Jun 04 2018 1:05AM | Last Updated: Jun 03 2018 8:42PMसावंतवाडी : शहर वार्ताहर

वाढत्या लोकसंख्येचा विचार करता,सर्वांसाठी पुरेसे पौष्टिक अन्नधान्य उत्पादन आणि 30 ते 35 कोटी तरुण, युवकांसाठी रोजगार निर्मितीत मधमाशीपालन महत्वपूर्ण योगदान देऊ शकते. निसर्ग समृद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मधमाशी पालन व्यवसाय होऊ शकतो,त्यामुळे जिल्ह्यातील युवकांनी मधमाशी पालनाकडे वळावे,असे आवाहन कलंबिस्त येथे पार पडलेल्या मधुमक्षिका पालन जनजागृती कार्यक्रमात करण्यात आले.

सावंतवाडी, सिंधुदुर्ग डायोसिझन डेव्हलपमेंट सोसायटी नवजीवन केंद्र सावंतवाडी आणि महाराष्ट्रातील पहिली मधमाशी पालनाची कंपनी प्रसारी हिना बीज प्रा.लि.कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने 31 मे रोजी कलबिस्त ग्रामपंचायत येथे एक दिवशीय मधुमक्षिकापालन  जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी नाबार्ड बँकेच्या रत्नागिरी विभागाच्या जिल्हा महा प्रबंधक (डीजीएम) तसेच प्रसारीचे संचालक प्रशांत सावंत, सारिका सासवडे, नवजीवन केंद्र सावंतवाडीचे समन्वय राजेंद्र कांबळे, गावचे सरपंच शरद नाईक, विविध भागातून युवक -युवती, शेतकरी गट उपस्थिती होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठया प्रमाणात झाडी आणि जंगल असल्यानं इथं मोठ्या प्रमाणात मधमाशी पालन व्यवसाय होऊ शकतो. त्यादृष्टीने इथं प्रयत्न चालू आहेत. शासनाच्या या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण भूभागापैकी 55टक्के भाग हा झाडाझुडपांचा आणि जंगलचा असल्यामुळे या जिल्ह्यात मधमाशीपालन व्यवसाय होवू शकतो. म्हणून जून 2015 मध्ये इंडियन रिचर्स इन्स्टिट्यूट खउ-ठ या संस्थेच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्यात एक जिल्हा निवडून तेथे मधमाशीपालन व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून कलंबिस्त या गावात नवजीवन केंद्र (एसएसडीएस) सावंतवाडी आणि प्रभारी कंपनी प्रयत्नशील आहेत. यासाठी नाबार्डचे सहकार्य मिळत आहे. 

आज भारताची लोकसंख्या 125 कोटी आहे, येत्या एक-दोन दशकात लोकसंख्या 150 कोटीपर्यंत पोहचेल. या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता,सर्वांसाठी सर्वांसाठी पुरेशे पौष्टिक अन्नधान्य उत्पादन आणि 30 ते 35 कोटी तरुण, युवकांसाठी रोजगार निर्मिती,अशी आव्हाने आहेत. मधमाश्यांपासून मध, मेण आदींचे संकलन प्रक्रिया आणि विक्रीतून युवकांना रोजगार मिळू शकतो.वनांचे पुनर्जीवन आणि प्रसार होतो. अनेक पिकांमध्ये परागसिंचन होऊन हेक्टरी उत्पादनात वाढ होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.प्रास्ताविक राजेंद्र कांबळे यांनी केले.आभार सारिका सासवडे यांनी मानले. 

मानवाचा सर्वश्रेष्ठ कीटकमित्र

विसाव्या शतकात थोर कीटक शास्त्रज्ञ एडवर्ड विल्सन यांनी उपयुक्त कीटकांमधील मानवाचा सर्वश्रेष्ठ कीटकमित्र असा,मधमाश्यांचा गौरव केला आहे.अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी तर,जर पृथ्वीवरील मधमाशी पालन लुप्त झाले, तर केवळ चार- पाच वर्षांत मानवजातीचा अंत होईल,असे स्पष्ट केले होते.मधमाशा नाहीत तर परागीभवन नाही,मग वनस्पती नाही आणि पर्यायाने प्राणी जीवन नाही,अशी नोंद आईन्स्टाईन यांनी करून ठेवली आहे,याचा उल्लेखही या कार्यक्रमात करण्यात आला.