Thu, Jun 20, 2019 00:32होमपेज › Konkan › न. प. कर्मचारी राज्य मेळाव्याला सभागृह नाकारले

न. प. कर्मचारी राज्य मेळाव्याला सभागृह नाकारले

Published On: Dec 11 2017 1:30AM | Last Updated: Dec 10 2017 9:35PM

बुकमार्क करा

चिपळूण : शहर वार्ताहर

राज्यातील विविध न. प. मध्ये असलेल्या स्वच्छता निरीक्षकांच्या चिपळूण येथे आयोजित राज्य मेळाव्याला सभागृह नाकारणार्‍या चिपळूण न. प.च्या नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांचा आम्ही जाहीर निषेध करीत असल्याची संतप्त भावना राज्य म्युन्सिपल कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी रविवारी दि. 10) पत्रकार परिषदेत व्यक्‍त केली.

चिपळूणातील विवेकानंद सभागृहात रविवारी सकाळी अकरा वा. राज्यभरातील विविध न.प.मध्ये  कार्यरत असलेल्या स्वच्छता निरीक्षक कर्मचारी संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला राज्यभरातील विविध न.प. मध्ये असलेले स्वच्छता निरिक्षक अधिकारी तसेच आरोग्य विभागातील प्रमुख कर्मचारी यावेळी मोठ्या संखेने उपस्थित होते तर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील न. प. कर्मचार्‍यांच्या विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी हजर होते.

राज्य म्युन्सिपल संघटनेचे कार्याध्यक्ष पवार यांच्यासह सचिव अनिल जाधव, विभागीय कार्याध्यक्ष विकास लगारे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत गोरे, सुभाष मोरे, सुरेश पोटतांडेल, चिपळूण न.प.चे अनंत हळदे आदी मान्यवर पत्रकार परिषदेला होते. वरील विषयाबाबत माहिती देताना कार्याध्यक्ष पवार यांनी सांगितले  की, राज्यातील विविध न.प. मध्ये कार्यरत असलेल्या स्वच्छता निरिक्षक कर्मचारी, अधिकार्‍यांबाबत शासनाने गतवर्षी केडर म्हणजेच संवर्ग लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही केली नाही. गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत शासनाचे धोरण उदासीन आहे. राज्यभरातील न.प.मधील स्वच्छता निरीक्षक कर्मचारी न्यायासाठी, विविध मागण्यांसाठी लढा देत आहेत. 

त्याचाच एक भाग म्हणून चिपळूण येथे राज्यभरातील निरीक्षक कर्मचार्‍यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी येथील स्थानिक अधिकारी व कर्मचार्‍यांनी मेळाव्यासाठी चिपळूण न. प.च्या स्व. खेडेकर संकुलातील इन -डोअर स्टेडियममधील सभागृहाची मागणी केली होती. त्यासाठी न.प. नियमानुसार पत्रव्यवहार व आवश्यक शुल्क देण्याचे नियोजन होते. मात्र, या मेळाव्याला जागा व सभागृह देता येत नाही. कारण मेळावा शासनाच्या विरोधात आहे, असे कारण सांगून, संबंधितांनी न.प.च्या अन्य अधिकारी, कर्मचार्‍यामार्फत निरोप देत, जागा देण्यास नकार दिला. 

दरम्यान, त्यांच्या या वृत्तीचा संघटनेच्यावतीने जाहीर निषेध करतो, अध्यक्ष किंवा मुख्याधिकारी हे न.प.चे मालक नाहीत, न्याय्य हक्कांसाठी संघटना रितसर मेळावा घेत असताना, त्याला न.प.चे सभागृह उपलब्ध करून न देणे हे दुर्देवी आहे, अशी भावना पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केल्या.